उदगीरच्या श्रीगोरक्षण संस्थेच्या गोशाळेचा उपक्रम

औरंगाबाद : मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी एक ते दोन क्विंटल सरपण लागते. तेवढे  जळण सध्या उदगीरच्या श्रीगोरक्षण संस्थेच्या गोशाळेकडून शेण, भुश्यापासून तयार करण्याचा प्रयोग केला जात आहे.  या प्रयोगाच्या माध्यमातून एक झाड  तुटण्यापासून वाचते. शिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही थांबवण्याचा प्रयत्न म्हणून टाकलेले पाऊल आहे, असा दावा गोशाळा संचालकांचा आहे.

उदगीरच्या गोशाळेत तयार होणारे जळण (जळतण) हे स्थानिक नगरपालिका खरेदी करत आहे. त्याच धर्तीवरचा प्रयोग राज्यभरातील २०० ते २५० गोशाळांमध्ये राबवणे गरजेचे आहे. यातून तयार होणारे जळण  स्थानिक स्वराज्य संस्थेने खरेदी केले तर वृक्षतोडीला आळा बसेल. शिवाय मराठवाडय़ासारख्या भागात वनीकरणातून झाडांचे जंगल उभे करता येईल, असा विश्वास उदगीरच्या गोशाळेचे संचालक डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी व्यक्त केला.

मराठवाडय़ातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिन्यांचा वापर केला जात नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर आता काही ठिकाणी विद्युत, गॅस दाहिन्या अंत्यसंस्कारासाठी उभारण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्या उभारून प्रत्यक्ष त्याचा वापर होईपर्यंत मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सरपणच वापरले जाईल. साधारणपणे एका मृत व्यक्तीसाठी एक ते दोन क्विंटल लाकूड लागते. तेवढे जळत शेण-भुस्सा व काही कचऱ्याचा वापर करून उदगीरच्या गोशाळेत तयार केले जाते. जळण तयार करणारे यंत्र राजस्थानातून गतवर्षी ७५ हजार रुपयांना खरेदी केल्याचे डॉ. लखोटिया यांनी सांगितले. त्यानंतर मराठवाडय़ातील जालना आदी काही ठिकाणच्या गोशाळा संचालकांनीही जळत तयार करण्याचा प्रयोग सुरू केला.

या प्रयोगाविषयी डॉ. लखोटिया सांगतात की, आमच्या गोशाळेत तयार होणारे जळण उदगीर नगरपालिकेकडून अंत्यसंस्कारासाठी म्हणून खरेदीही करण्यात येते. ३ ते ४ रुपये किलोच्या दराने  जळणाची खरेदी होते. गोशाळेत लहान-मोठे मिळून १३० च्या संख्येने पशुधन आहे. त्यांच्या शेणाचा जळणासाठी वापर केला जातो. जळण सुकण्यासाठी ४ ते ५ दिवस लागत असल्याने साधारणपणे उन्हाळ्यात अधिक काम केले जाते. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी झाडे लावण्याच्या सल्ला दिला जातो. पण झाडे लावण्यापेक्षा त्याच्या तोडीचा वेगच अधिक आहे. नव्या प्रयोगातून किमान एक झाड तरी दररोज वाचेल, असा आमचा विश्वास आहे. सध्या गोशाळांसाठीचे दान करणारे हात कमी झाले आहेत. तेव्हा शेण, गोवऱ्या, गोमूत्र, अशांवरच गोशाळांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न आहे.