डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महिको कंपनीत करार
औरंगाबाद :  पिकाचे सर्वेक्षण, उत्पादकता, पडणारे रोग, आवश्यक हवामान, त्याची आजची स्थिती या माहितीबरोबरच  मातीचा पोत, त्यातील नत्र, स्फुरद आणि पालाश यासह अन्य घटकद्रव्यांची बारकाईने परीक्षण करण्यासाठी ‘फिल्ड सेक्टो रेडिओमीटर’ या उपकरणाचा उपयोग करून कापूस या पिकांवरील माहिती घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्याापीठ आणि महिको य बियाणे कंपनीबरोबर सामंजस्य करार झाले आहेत. ‘रिमोट सेन्सिंग’ च्या मदतीने मिळणारा सांख्यकीय माहिती आणि कृषीतील समस्या याची नवी सांगड घातली जात असून येत्या काळात या कपंनीबरोबर सेंद्रीय कर्ब आणि माती परीक्षणाचे नवे परिणामही अभ्यासले जाणार आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा शेतीला अधिक फायदा मिळावा असे प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू झाले आहेत. विद्यापीठांच्या संशोधनाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे केले जात असतानाच नव्या सामंजस्य करारामुळे संशोधनाही नवे आयाम मिळतील असा दावा केला जात आहे.

बोंडअळीमुळे कापासाचे गेल्या तीन-चार वर्षापूर्वी कमालीचे नुकसान झाले होते.  जैव- तंत्रज्ञान वापरून कापूस उत्पादनात क्रांती झाली असली तरी कीड नियंत्रण ही समस्या नेहमीच असते. तसेच कापसावर पडणारे रोग आणि लागणारी कीटकनाशके यामुळे उत्पादन खर्च वाढतो. त्यावर मात करण्यासाठी आवश्यक माहिती देणारे तंत्रज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये २०१३ पासून आहे. आता त्याचा वापर शेतीसह विविध संशोधनात करता येते. आता त्यासाठी कुशल मनुष्यबळही तयार होत असल्याचा दावा माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.रत्नदीप देशमुख यांनी केला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागात संशोधन करणाऱ्या विद्याथ्र्यांकडून माती परीक्षणासाठी आवश्यक सर्व घटकांवर विद्याथ्र्यांनी स्वतंत्र संशोधन केले असून त्याचा एकात्मिक अभ्यासही पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या शेतीमधील पिकांची वाढ, उत्पादकता, रोग, कीड, त्याला लागणारे कीटकनाशके याचा अभ्यास आणि त्यावरील उपाययोजना सहजपणे करता येईल. विशेष म्हणजे राज्यात अशा प्रकारची यंत्रणा आणि त्याचा वापर करण्याची कार्यपद्धती कोठेही निर्माण झालेली नाही. या पूर्वी इटलीतील सॅनिओ विद्यापीठाबरोबर तसेच रशियातील साऊथ सेंट्रल विद्यापीठाबरोबरही सामंजस्य करार झाले असून या दोन्ही विद्याापीठातील तज्ज्ञ आता माहिती व बौद्धिक आशयाची देवाणघेवाण करू लागली आहेत. विज्ञान विभागाकडून ५० लाख रुपये खर्चून प्रयोग शाळेत घेतलेल्या फिल्ड सेक्टो रेडिओमीटरचे अनेक फायदे असून उपग्रहाव्दारे केलेल्या सर्वेक्षणानुसार पीक उत्पादकतेचेही अंदाज घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोणत्या भागाता कोणते पीक, त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याची माहिती मिळू शकेल. बियाणांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिको कंपनीबरोबर आता विद्यापीठाचा सामंजस्य करार कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान यातील अंतर कमी होईल असा दावा केला जात आहे.

या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी समस्या सोडविण्यासाठी व्हायला हवा असा आमचा प्रयत्न आहे. ‘फिल्ड सेक्टो रेडिओमीटर’ या उपकरणाचा उपयोग प्रयोगशाळेत आणि बाहेरही करता येतो. त्या आधारे जमिनीवरील आणि भूगर्भातील माहितीही मिळविता येते. पण कृषीमध्ये याचा उपयोग व्हावा असे प्रयोग करण्याचे तंत्रज्ञान विकसित करुन विविध संस्थांना बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महिकोबरोबर या पूर्वीच काम सुरू झाले होते. करोनामुळे लांबलेला करार आता पूर्ण झाला आहे. यामुळे कापसावरील रोग, कीड, याचे व्यवस्थापन करणे सोपे जाणार आहे. रिमोट सेन्सिंग पद्धतीमुळे आता मिळणाऱ्या माहितीची व्याप्तीही वाढत असल्याने त्याचे फायदे अधिक होतील. – डॉ. रत्नदीप देशमुख, विभागप्रमुख, माहिती तंत्रज्ञान