राजस्थानातील राष्ट्रीय स्वयंसेवक संमेलनात आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत शहरातील कामगार आयुक्त कार्यालय परिसरातील संघ कार्यालयावर रविवारी तीन ते चार महिला कार्यकर्त्यांनी निळ फेकल्याचा दावा रिपाइं खरात गटाकडून करण्यात आला आहे, तर संघाचे प्रसिद्धी प्रमुख वामनराव देशपांडे यांनी केवळ निषेध व्यक्त केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मनमोहन वैद्य यांनी दलित व ओबीसींना आरक्षण देऊन वेगळे पाडण्यात आल्याचे व आरक्षण संपविण्याबाबतचे वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून रिपाइंच्या खरात गटाकडून रविवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास संघ कार्यालयाजवळ तीन ते चार महिला आल्या व त्यांनी निळ फेकली. कार्यालयाचे प्रवेशद्वार संपूर्णपणे निळे झाले होते, असा दावा जिल्हाध्यक्ष फकिरचंद औचरमल यांनी केला आहे. या संदर्भात संघाचे प्रसिद्धी प्रमुख वामनराव देशपांडे यांनी मात्र निळ फेकल्याचा दावा फेटाळला असून केवळ येऊन निषेधाच्या घोषणा दिल्याचे सांगितले. या प्रकरणी कुठलीही तक्रार रात्री उशिरापर्यंत दाखल झालेली नव्हती.