शिक्षकाचा गारखेडा, गाडीवाट शाळेत अभिनव ‘गृहपाठ’

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

गारखेडा गावातील शिवनंदा चौधरींना एके दिवशी मुलगा गणेश भांडी घासण्यासाठी मदत म्हणून पुढे आला. त्यांना नवल वाटले. पण मुलांनी असे काम करायचे नसतात, म्हणून त्यांनी गणेशला बाजूला सारले. मात्र मुलाने जेव्हा शाळेतून दिलेला हा गृहपाठ आहे, असे सांगितले तेव्हा मात्र शिवनंदाताईंना काय बोलावे, हे समजेना. शाळेतील शिक्षकाने ‘चला, आईसोबत भांडी घासू या’, असा मुलांसाठी अभिनव गृहपाठ दिला होता. यासह शाळेत आणखीही प्रयोग झाले. मुले, शिक्षक, पालकांनी एकत्रच बसून शाळेतच चित्रपट पाहायचा. मुलांनी आई-वडील आणि शिक्षक का चिडले, हे जाहीरपणे सांगायचे. यातून मुले-पालकांमधील संवाद सुरू झाला. चिडचिडेपणा कमी झाला. मुलांमधील व्रात्यपणा वृत्ती गळून पडण्यासह गावातील सामाजिक आणि मानसिकतेतही सकारात्मक बदल समोर येऊ लागले. असेच काही अभिनव प्रयोग गाडीवाट येथील शाळेतही सुरू असतात.

औरंगाबादपासून १८ किलोमीटर अंतरावर हे गाडीवाट गाव. डोंगराच्या कुशीतून वाट काढतच तेथपर्यंत पोहोचावे लागते. दोन-अडीच हजार लोकवस्तींचे हे गाव. गावच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक दादासाहेब नवपुते या शिक्षकाने मुख्याध्यापक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन वरीलपैकी काही अभिनव प्रयोग गारखेडा येथे तर काही गाडीवाट येथे केले आहेत. गाडीवाट येथील विद्यार्थी शाळेची वेळ सकाळी साडेनऊची असताना आठलाच येतात. ही शाळा आता तर रविवारीही गजबजलेली असते. वर्षांचे ३५० दिवस शाळा सुरू राहील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा मानस मुख्याध्यापक पद्माकर हुलजुते यांनी व्यक्त केला. ही शाळा आता इस्रोने तयार केलेला महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डाचा (एमआयईबी) अभ्यासक्रम शिकवण्यासाठी औरंगाबादेतून निवडलेल्या पाच प्रस्तावित यादीत समाविष्ट असलेल्यांपैकी एक आहे. राज्यात अशा १०० शाळा निवडायच्या आहेत.

चिडल्यानंतर मुलांचे शिक्षण थांबते

गाडीवाट येथील शाळेतील शिक्षकांनी मुलांवर चिडायचे नाही, असा नियम स्वतवर घालून घेतला आहे. त्याचे कारण काय, असे विचारले असता दादासाहेब नवपुते म्हणाले, मेंदूच्या क्रियांचा अभ्यास आम्ही स्वखर्चाने तज्ज्ञांकडून केला. मुलांना दरडावल्यानंतर त्यांचा मेंदू प्रतिक्रिया किंवा बचाव करण्याचा विचार करतो. यातून दीड तास शिक्षण थांबते. हे खरे तर शिक्षकांचेच नुकसान.