मराठवाडय़ास मोठय़ा पावसाची प्रतीक्षा

पेरणीसाठी आवश्यक असणारा पाऊस पहिल्या टप्प्यात पडून गेला आणि नंतर पावसाची रिमझिम या आठवडय़ात सुरू झाली. मराठवाडय़ातल्या पाणीसाठय़ात मात्र अजूनही पुरेशी वाढ झालेली नसल्याने टंचाईचे सावट दूर झालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्य़ात जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात ९३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मराठवाडय़ातील ७५ लघु प्रकल्पांमध्ये केवळ १९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात काहीशी वाढ असली तरी धरणात पाणी येईल, असा पाऊस झालेला नाही. परिणामी शेतक ऱ्यांमध्ये तर धाकधूक आहेच. अजूनही टंचाईचे संकट टळलेले नाही. मराठवाडय़ात परतीच्या पावसाचा जोर अधिक असतो. या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला असला तरी मध्येच पावसाने दडी मारल्याने धरणांमध्ये म्हणावा असा पाणीसाठा नाही.

मराठवाडय़ात ७४२ लघु प्रकल्प आहेत. या लघु प्रकल्पांमध्ये केवळ १३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ८ टक्के एवढा होता.

औरंगाबाद जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. विशेषत: पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तालुक्यांमध्ये ८ दिवसांपूर्वी दुबार पेरणी करावी लागेल की काय, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, रिमझिम पावसामुळे पिके आणखी काही दिवस तगतील. जिल्ह्य़ातील ९० प्रकल्पांमध्ये केवळ ६ टक्के पाणीसाठा आहे. सुखना, लाहू, गिरिजा, वाकोल, खेळणा, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर, अंजनापळशी, शिवनाटाकळी, टेंभापुरी, नारंगी, बोरदहेगाव या प्रकल्पांमध्ये आजही शून्य टक्के पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पही भरले नसल्यामुळे टंचाईची स्थिती कायम आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी काही ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र, धरणांमध्ये पाणी असल्यामुळे टंचाई दिसून येत आहे. जेथे जेथे पिण्यासाठी पाणी आवश्यक आहे तेथे टँकर देण्याशिवाय पर्याय नाही, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले.

मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ात मात्र अजून पिण्यासाठी टँकर लावले गेलेले नाही, ही तेवढी आनंदाची बाब. मोठा पाऊस झाला नाही तर अन्य जिल्ह्य़ातही टँकर लावावे लागण्याची शक्यता आहे. अजूनही धरणांमध्ये पाणीसाठी न झाल्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांचे मात्र फावले आहे. काही ठिकाणी महसूल प्रशासन कारवाया करत असले तरी वाळूची वाहतूक वाढलेली आहे. सर्वात कमी पाणीसाठा असणारा जिल्हा औरंगाबाद असून त्या खालोखाल परभणी जिल्ह्य़ाचा क्रमांक आहे. या जिल्ह्य़ातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पीक स्थिती चांगली असली तरी पाणीसाठा वाढलेला नाही. यावेळी दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्य़ात लातूरपेक्षा अधिक पाणी आहे. उस्मानाबादच्या १७ मध्यम प्रकल्पांमध्ये २३ टक्के तर लातूरच्या ८ प्रकल्पांमध्ये १६ टक्के पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील खासापुरी, चांदण, खंडेश्वर या प्रकल्पांमध्ये अजूनही शून्य टक्के पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्य़ातील महालिंगी, लातूर जिल्ह्य़ातील बोरगाव येथेही पाण्याची पातळी शून्यावरच आहे. अन्य धरणांमध्येही एक ते चार टक्के एवढाच पाणीसाठा आहे.

उपयुक्त पाणीसाठय़ाची टक्केवारी  गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक दिसत असली तरी मोठा पाऊस झाला नाही  तर अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे.  मराठवाडय़ातील ११ मोठय़ा प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्य़ांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

उर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी

नाशिक जिल्ह्य़ातील पावसामुळे जायकवाडी धरणात पाणी येऊ लागले असल्याने धरणांच्या टक्केवारीमध्ये वाढ होत आहे. २३.४७  टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याने औरंगाबाद व परिसरातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्यामुळे तातडीने निर्माण होणार नाहीत, अशी स्थिती आहे. गेल्या आठवडाभरात जायकवाडीत पाण्याचा ओघ वाढला आहे.