11 December 2018

News Flash

शिवसेनेतील वर्चस्वाचे राजकारण

हर्षवर्धन जाधव यांचे शक्तिप्रदर्शन; खासदार खरे यांची अडचण

हर्षवर्धन जाधव यांचे शक्तिप्रदर्शन; खासदार खरे यांची अडचण

दुचाकी गाडय़ांवर भगवे झेंडे, गळय़ात शिवसेनेचा गमछा घातलेले शेकडो कार्यकर्ते गावोगावी. प्रत्येक गावात स्वागताची कमान. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फलक, जागोजागी भगवे झेंडे, अशा वातावरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी शक्तिप्रदर्शन केले. कारण टोकाच्या नाराजीनाटय़ानंतर हर्षवर्धन जाधव यांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास अनुमती दिली होती. निमित्त होते तेजस्विनी जाधव लिखित ‘रायभान जाधव व्यक्ती आणि विचार’ या पुस्तक प्रकाशनाचे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे शिवसेनेतून जवळपास निघून गेलेले हर्षवर्धन जाधव हे पुन्हा सेनेमध्ये पहिल्या रांगेत आले. परिणामी खासदार खरे यांच्या राजकारणाला मोठा छेद बसला आहे. या घडामोडी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष झाल्याने खरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कन्नड मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात रायभान आघाडीचे उमेदवार उभे केले होते. शिवसेना आमदार पक्षाच्या विरोधात उभे राहतात, असे चित्र त्यामुळे निर्माण झाले होते. या निवडणुकांच्या काळात खासदार खरे यांनी खासदार निधीमध्ये घोळ घातले असल्याचा आरोप आमदार जाधव यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविला. त्यामुळे खासदार निधीतील कामांची चौकशी करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार जाधव यांच्याकडून मदत मिळणार नाही, असे गृहीत धरून खासदार खरे यांनी वेगळेच राजकारण केले. हर्षवर्धन जाधव यांचे विरोधक उदयसिंह राजपूत यांना शिवसेनेमध्ये प्रवेश द्या, अशी गळ पक्षप्रमुखांना घातली. त्यांनीही राजपूत यांना शिवबंधनात अडकवले. तत्पूर्वी कन्नड मतदारसंघात उदयसिंह राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ६०९८१ मते मिळविली होती. त्यांचा केवळ १५६१ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे सेनेत आल्यानंतर खासदार खरे यांच्या मदतीने शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळेल, अशी राजपूत यांना आशा. पण हर्षवर्धन यांच्या रविवारच्या शक्तिप्रदर्शनामुळे खरे यांच्या राजकारणाला छेद बसल्याचे मानले जात आहे.

सर्वसाधारणपणे पुस्तक प्रकाशनाचे सोहळे एखाद्या सभागृहात होतात. पण कन्नडमध्ये पुस्तक प्रदर्शनाची सभा होती. त्यामुळे राजकीय भाषणे जोमात झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी खासदार खरे बसले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव पुढे आले आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये बरीच चलबिचल होती. ती जाणवेल, असा हशा उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचविला. जाधव यांच्या या कार्यक्रमास शिवसेनेमधूनही अनेकांनी मदत केली. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तर जाहीरपणे आमदार जाधव यांची बाजू घेतली. सभेत भाषणादरम्यान ते म्हणाले, ‘खरेसाहेब, हर्षवर्धनच्या मागचा ‘सासुरवास’ आपण जरा कमी करायला पाहिजे.’ या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अर्जुन खोतकर आणि खासदार खरे यांना आपले सासरे असे संबोधल्याची पाश्र्वभूमी होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे आमदार जाधव यांचे सासरे. पण जाधव यांनी भाजपची वाट पत्करण्याचे टाळले आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना सोडण्याची मानसिकता तयार केल्याचे काही दिवसांपूर्वी दिसत होते. काँग्रेस नेत्यांबरोबर त्यांची ऊठबसही वाढली होती. काही जाहीर कार्यक्रमासही काँग्रेस नेत्यांना त्यांनी आवर्जून बोलावले होते. या पाश्र्वभूमीवर सेनेची उमेदवारी बदलली जाईल, असे स्पष्ट दिसत असताना हर्षवर्धन जाधव यांनी केलेले शक्तिप्रदर्शन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने खासदार खरे यांच्या राजकारणाला छेद बसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार खरे यांना ‘आपले’ समर्थक सांभाळण्यासाठी वेगळी कसरत करावी लागणार आहे.

First Published on November 14, 2017 1:11 am

Web Title: internal dispute in shiv sena 4