हॉकी, फुटबॉलसह बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल छावणीत उभारण्याबाबत छावणी परिषदेला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. या संकुलासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यास पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

छावणी मंडळाचे अध्यक्ष तथा कमांडर ब्रिगेडियर अनुराग विज यांच्या कार्यालयात छावणी परिषदेच्या समस्या, तसेच गोलवाडी नाका रस्ता रुंदीकरणाबाबत बठक झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यू. जे. चामरगोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा आदी उपस्थित होते.

क्रीडा संकुलाच्या यापूर्वीच्या प्रस्तावात पूर्ण तपशील नव्हता. शिवाय खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने येथे व्हावेत, अशा दर्जाचा प्रस्ताव सादर करा, त्याला छावणी परिषदेची तत्काळ मान्यता मिळवून देऊ, अशी ग्वाही ब्रिगेडियर विज यांनी दिली. हॉकीसाठी अ‍ॅस्ट्रोटर्फ मदानाचा समावेश करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. क्रीडासंकुलासाठी खासदार खैरे यांनी केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भात राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, क्रीडा सचिव नंद व क्रीडा संचालक राजाराम माने यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही खैरे यांनी सांगितले. क्रीडा संकुलात इनडोअर मल्टीपर्पज हॉल, स्पश, जिम या सोबत विविध क्रीडांगण असणार असून १० ते १२ एकर जागा त्यासाठी लागणार आहे. ही जागा छावणी परिषद उपलब्ध करून देईल, असे छावणी परिषदेच्या वतीने ब्रिगेडियर विज यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ता रुंदीकरणासंदर्भात गोलवाडी ते क्रांतिचौक रस्त्याची या वेळी पाहणी करण्यात आली. या संदर्भात नगरनाका येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ब्रिगेडियर विज यांनी केल्या. वृक्षलागवड करताना भविष्यातील रुंदीकरण लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्याच्या सूचना खैरे यांनी दिल्या.