पैठणमध्ये गुन्हे शाखेची कारवाई

औरंगाबाद : बँकेतून काढलेली रक्कम किंवा पैशांची बॅग कार आदी ठिकाणी ठेवून इतर ठिकाणी जाणाऱ्यांवर पाळत ठेवत चोरी करणाऱ्यांच्या आंतरराज्यीय टोळीला पैठणमधून जेरबंद करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेल्या टोळीतील सहाही सदस्य तामिळनाडू, आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहेत. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी बॅग चोरी करण्यासाठी वापरलेले २५ मोबाइल, पाच दुचाकी, रोख रक्कम ५२ हजार रुपये, बॅग चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य आदी जप्त केले असून चोरीच्या शंभरावर घटना त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रकाश नारायणा मेकला असे टोळीप्रमुखाचे नाव असून तो चेन्नई येथील रहिवासी आहे. चेन्नईचेच राजू नारायणा कोलम, राजू यादगीर बोनाला, जोसेफ नारायणा मेकला, अशोक नारायणा कोलम व आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील सुरेश अंजय्या बोनालू, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विविध शहरातून बॅगा चोरी करणारी टोळी पठण येथे महिनाभरापासून आली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मिना मकवाना,गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय जाधव आदींच्या पथकाने पठण शहरातील नारळा व संतनगर भागात सापळा रचून टोळीच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने औरंगाबादमध्ये ६ ठिकाणाहून बॅग चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पत्रकार बैठकीला पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आदी उपस्थिथ होते.

या शहरांमधून चोरी

पकडण्यात आलेल्या आंतरराज्यीय टोळीने महाराष्ट्रातील औरंगाबादसह नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे, अकोला, अमरावती आदी शहरांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली राज्यातही बॅगा चोरी केल्याचे समोर आले आहे. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी बीड जिल्ह्य़ातील गेवराई येथे कारची काच फोडून ९ लाख रुपये पळवल्याचेही समोर आल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.