19 October 2019

News Flash

गर्दभांना जपा बरं का!

गाढवांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाला आढळले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संख्या घटतेय,पशुसंवर्धन विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

जर गाढवांना जपले नाही तर भविष्यात ‘गाढवा’ असा उपरोधिक आणि हीन उल्लेख तेवढा शिल्लक राहील. कारण गाढवांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाला आढळले आहे.

गाढवांची संख्या कमी होत असल्याबद्दल राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने चिंता व्यक्त करताना गाढवाचे रक्त आणि अवयव पशुखाद्यात पूरक म्हणून वापरले जात असल्याचा संशय आहे. गाढवाच्या कातडीचा उपयोग चीनमध्ये कर्करोगावर उपचारासाठी बेकायदा केला जातो, असे केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या कार्यालयाच्या इतिवृत्तात म्हटल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांनी केल्या आहेत. त्यामुळे ‘गाढवे जपा हो,’ असा संदेश आता देण्यात आला आहे.

पशुगणनेमध्येही गाढवांची संख्या कमी होत असल्याचे आढळले होते. राज्यात गाढवांची संख्या २९ हजार १३२ आहे. केंद्रीय मंत्र्यांनी गाढवांची संख्या सातत्याने कमी होत असून त्याकडे लक्ष दिले नाही तर गाढव नामशेष होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती. खरेतर गाढवाच्या मांसविक्रीची एकही नोंद राज्यात नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आल्याचे पशुसंवर्धन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा करण्यासाठी गाढवांचा सर्रास उपयोग होत असल्याचे आढळले होते. मात्र, त्यांची संख्या घटत असल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांना गाढवांच्या घटत्या संख्येवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

खास प्रयत्नांची गरज

ओझ्याचे गाढव, गदर्भगान, गाढवा पुढे वाचली गीता असे दैनंदिन व्यवहारातील शब्दप्रयोग किंवा म्हणी ज्या प्राण्याशी संबंधित आहेत तो प्राणीच भविष्यात टिकविण्यासाठी खासे प्रयत्न करावे लागतील, अशी स्थिती आल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या पत्रामुळे पुढे आले आहे.

First Published on May 7, 2019 2:18 am

Web Title: investigate the donkeys