आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले नासेरबिन अबु बखर याफई (वय ३१) व महंमद शाहेद अलिखान (वय २४) या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत १२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश दहशतवादविरोधी विशेष न्यायालयाने दिले. दोन तासांहून अधिक काळ या अनुषंगाने इन कॅमेरा सुनावणी झाली. परभणीतील या दोघांना आयसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक झाल्यानंतर महंमद शाहेद याच्याकडून बॉम्ब करण्याचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले होते. जप्त केलेल्या साहित्यापैकी अर्धा भाग अजून शोधायचा असल्याने पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली होती.

परभणी येथून नासेरबिन अबू बखर यास दहशतवादविरोधी पथकाने पकडल्यानंतर त्याची चौकशी केली असता महंमद शाहेद या त्याच्या मित्राकडे बॉम्ब बनविण्याचे साहित्य आढळून आले.

हे आरोपी इसिसच्या संपर्कात होते. तसे चॅटिंग पोलिसांकडे उपलब्ध आहे. या आरोपींना हवालामार्फत पैसा मिळणार होता. या पैशांतून ते बॉम्ब तयार करून रमजानच्या काळात अशांतता पसरविणार होते, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दहशतवादविरोधी पथकाचे एकमेव पोलीस ठाणे मुंबईतील काळाचौकी येथे आहे. तेथे गुन्हा नोंदविण्याऐवजी नांदेड येथे नोंदविलेल्या गुन्ह्य़ाबाबत आरोपींच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान आक्षेप घेतले होते. या अनुषंगाने कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.