दहशतवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम सुरू केली असून शनिवारी पहाटेपर्यंत देशभरात २० जणांना अटक झाली आहे. शनिवारी औरंगाबाद जिल्ह्य़ात इमरान पठाण याला अटक करण्यात आली असून तोदेखील आयसिससाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात होता, असे उघड झाले आहेत. अटक झालेले सर्वजण आयसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थक वा हस्तक आहेत.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर येथील बडी मस्जिद भागातून पठाणला अटक झाली असून तो बेरोजगार आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून खलिद अहमद अलि नवाजुद्दिन ऊर्फ रिझवान याला अटक झाली आहे. गेल्या वर्षी मुंबईतील मालवणी येथील चार तरुणांना आयसिस भरतीसाठी त्याने प्रेरित करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
प्रजासत्ताकदिनी दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्या १४ जणांना शुक्रवारी अटक झाली होती. त्यात मुंबईतील माझगाव येथील हुसेन खान याला तसेच शनिवारी अटक झालेल्या इमरान पठाणला राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात देण्यात आले असून हे दोघे आयसिससाठी तरुणांची भरती करण्याच्या कामात सामील होते, असे दहशतवादविरोधी पथकाने सांगितले. अधिक तपशील देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. खान याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. ही मोहीम सुरूच असून दहशतवादी कारवायांत सामील असलेल्या आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.
हैदराबादेतील महंमद नफीस खान, महंमद शरीफ मौनुद्दीन खान, मंगळुरूचा नजमुल हुडा, बंगळुरूचा महंमद अफजल यांचा अटक केलेल्यात समावेश आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ते निरपराध असल्याचा दावा केला आहे. सुरक्षा दले भल्या पहाटे कथित दहशतवाद्यांच्या मुक्कामी पोहोचली व त्यांना ताब्यात घेतले. शेख हा स्वत:ला आमीर समजतो, तर हुडा हा आर्थिक पुरवठादार आहे. ते इंटरनेटवर सीरियातील दहशतवाद्यांशी संपर्कात होते.

सात कलश रख दो!
आयसिसचा कमांडर शफी आरमर हा अकलाख उर रेहमान याच्याशी संपर्कासाठी वापरत एक आयपी होता. रेहमान याला हरिद्वार येथे इतर तिघांसह अटक झाली आहे. जानेवारीच्या मध्यावधीत युसूफ व अखलाख यांनी एकमेकांना ‘सात कलश रख दो’, असा संदेश पाठवला होता. या सांकेतिक संदेशातून सात ठिकाणी बॉम्ब ठेवण्याच्या कटाची माहिती उघड झाली.