मराठवाडय़ात काही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे प्रयत्न सुरू आहेत. मेक इन इंडियाच्या मुंबईमधील कार्यक्रमात या अनुषंगाने काही घोषणा होण्याची शक्यता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत मायक्रोसॉफ्ट, गुगल व जर्मनच्या एसटीएस कंपनीने गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. पुढील ५ वर्षांत सुमारे १० हजार ७०० कोटींची गुंतवणूक अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या करण्यास तयार असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले असल्याची माहिती या वेळी उद्योगमंत्र्यांना देण्यात आली.
मराठवाडय़ात शेतीची अवस्था बिकट आहे. त्यावर अवलंबून लोकसंख्या अन्य व्यवसायाकडे वळविण्याचे धोरण आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मराठवाडय़ात गुंतवणूक वाढावी, या साठी प्रयत्न केले जात आहेत. काही कंपन्यांना इनोव्हेशन सेंटर करावयाचे आहे. ते मराठवाडय़ात सुरू व्हावे, या साठी प्रयत्न सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.
येत्या काळात उद्योगात नावीन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्यांसाठी ‘सीडबी’बरोबर करार केला असून, त्यासाठी ७५ कोटी रुपये राज्य सरकारने दिले होते. आता हे भांडवल २०० कोटी रुपये झाले आहे. या निधीतून नावीन्यपूर्ण उद्योजकांना मदत करणे शक्य होणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. काही जागतिक दर्जाच्या कंपन्या येण्यास उत्सुक आहेत. मात्र, याबाबतची अधिक माहिती मेक इन इंडियात जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले.
‘वीजदर कमी होतील’
येत्या दोन महिन्यात मराठवाडा व विदर्भातील वीजदर कमी होतील, असे सूतोवाच उद्योगमंत्री देसाई यांनी केले. वीजदर इतर राज्यांच्या तुलनेने अधिक आहेत. त्यामुळे उद्योगांना स्पर्धा करताना अडचणी जाणवतात. ही बाब ऊर्जामंत्र्यांना सांगितली आहे. त्यासाठी वीज अधिकाऱ्यांसह बठकही घेण्यात आली. येत्या दोन महिन्यांत या अनुषंगाने निर्णय होण्याची शक्यता आहे. वीजदर किफायतशीर होणार नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.