23 October 2019

News Flash

जायकवाडी भरले तरी मराठवाडा तहानलेलाच!

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधीची गरज

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या ४४ वर्षांत जायकवाडी धरण आठवेळा शंभर टक्के भरले खरे, पण कालव्यांची दुरुस्ती आणि सिंचनासाठी लागणारा पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने लाभक्षेत्राला पुरेसा फायदा होऊ शकलेला नाही.

अलीकडेच जायकवाडी धरण भरले आणि नांदेडपर्यंत गोदाकाठच्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित मराठवाडय़ात दुष्काळाने जणू ठिय्या मांडल्यासारखे चित्र आहे. जायकवाडी आणि विष्णुपुरी वगळता  निम्नदुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीनाकोळेगाव या धरणांमध्ये शून्य टक्केही पाणीसाठा नाही. एका बाजूला भरलेले धरण आणि दुसरी बाजू कोरडीठाक दुष्काळाची अशा  स्थितीत मराठवाडा अडकला आहे.

नगर-नाशिकमध्ये पाऊस झाल्यानंतर जायकवाडी धरण ९९.३८ टक्क्यांपर्यंत भरले. त्याचा लाभ भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास होईल. परिणामी डाव्या कालव्यावर एक लाख ४१ हजार हेक्टर जमीन सिंचित होईल, तर अहमदनगर व बीड जिल्ह्य़ातील ४३ हजार ६८५ हेक्टर जमिनीला पाणी मिळू शकेल.

मात्र, सिंचन करताना पीक रचनेचे नियम पाळले गेले तरच. खरिपात २२ टक्के तर रब्बीमध्ये ७७.५० टक्के भूभाग सिंचनाखाली येईल, अशी तजवीज प्रकल्प अहवालात नमूद आहे. असे करताना खरिपात ज्वारी १२ टक्के आणि भात १० टक्के असे क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. मराठवाडय़ात भात हे पीक होत नाही. रब्बी हंगामात गहू २५ टक्के, ज्वारी, मका १५ टक्के आणि हरभरा पाच टक्के अशी पिके घ्यावीत, असे अपेक्षित होते. पण मराठवाडय़ात सोयाबीन आणि कापूस या पिकांबरोबर वाढ झाली आहे ती उसाची. खरेतर बारमाही पिकांमध्ये केवळ तीन टक्के उसाचे क्षेत्र असावे, असे अपेक्षित आहे. मराठवाडय़ात गोदाकाठी उसावरील प्रेम अधिकच वाढलेले आहे.

१९७७ साली  ९९.८३, १९८३ साली शंभर टक्के धरण भरले. पण तोपर्यंत शेतीला पाणी देणे शक्य नव्हते. कारण कालवेच तयार नव्हते. १९८४ साली जायकवाडीचे कालवे तयार झाले.अहमदनगर  आणि बीड जिल्ह्य़ातील माजलगावपर्यंत या कालव्याचे लाभक्षेत्र आहे. कालवे दुरुस्तीसाठी तातडीने २५ कोटी रुपयांची गरज असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात. ही रक्कम मिळाली नाही तर धरण भरूनही लाभक्षेत्र वाढणार नाही.

आठ हजार गावांना प्रतीक्षा

मराठवाडय़ातील साडेआठ हजार गावांपैकी जायकवाडीच्या धरणावर अवलंबून असणाऱ्या ३८६ गावांमध्ये या वर्षी चांगले सिंचन होईल. मात्र, बाकी मराठवाडा तहानलेला असेल. औरंगाबाद, परभणी, जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्य़ांसह विष्णुपुरीमुळे नांदेड जिल्ह्य़ातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ांत पुन्हा एकदा मोठी पाणीटंचाई असेल, असे दिसून येत आहे.

First Published on September 17, 2019 1:40 am

Web Title: jaikwadi dam is full but marathwada is thirsty abn 97