औरंगाबाद जिल्हातील गंगापूर शहरातील जैन मंदिरातून सोमवारी पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी आणि तीन मूर्ती लंपास केल्या होत्या. चोरीला गेलेल्या जैन मंदिरातील त्या तीन मुर्ती मंगळवारी गंगापूर पंचायत समितीच्या आवारात सापडल्या. गावकऱ्यांना मूर्ती पंचायत समिती आवारात आढळल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या मूर्ती मंदिरप्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत.

चोरट्यानी जैन मंदिरातील दाननपेटी आणि मूर्तीसोबतच किराणा दुकान आणि कपड्यांच्या दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली होती. मंदिरातील मूर्तीसह तीन ठिकाणी चोरी झाल्यानं शहरात खळबळ उडाली होती. चोरीला गेलेली दानपेटी आणि इतर मालासंदर्भातील तपास सुरु आहे. मात्र चोरीला गेलेल्या मूर्ती पंचायत समिती आवारात आढळल्या.
आंबेडकर चौकातील जैन मंदिरासह शिवाजी चौक येथील लाहोटी किराणा या दुकानाचे दोन्ही शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानातील सामान लंपास केलं. त्याचबरोबर बाजूलाच असलेल्या ‘माऊली’ या कपड्याच्या दुकान फोडून या दुकानातही चोरी करण्यात आली होती. मूर्ती सापडल्या असून तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.