27 January 2020

News Flash

जलयुक्त शिवार कोरडेच!

सगळे काम पूर्ण झाल्यानंतरही पाऊस नसल्यामुळे सगळा मराठवाडा चिंतेत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील साडेआठ हजार गावांपैकी ५२०९ गावे जलपरिपूर्ण असल्याचा दावा सरकारी यंत्रणा करत आहे. ज्या गावात पाऊस पडला तर पाणी अडवले जाऊ शकते, अशी पाणलोटाची कामे माथा ते पायथा पूर्ण करण्यात आली आहेत. केवळ जलयुक्तच नाही तर ४४ हजार २८८ शेततळी बांधून पूर्ण झाली आहेत. म्हणजे सरासरी काढली तर प्रत्येक गावाला पाच शेततळी. अर्थात अशी सरासरी काढणे चूक ठरेल. कारण काही गावांमध्ये शंभराहून अधिक शेततळी उभारली आहेत. पण ही सगळी कामे सध्या काहीएक उपयोगाची ठरत नाही. कारण मराठवाडय़ात पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी सारे जलयुक्त शिवार कोरडे पडले आहे.

मराठवाडय़ात पावसाचा खंड अधिक असल्यामुळे संरक्षित सिंचन व्हावे यासाठी डोंगरमाथ्यावर सलग समतर चर खणण्यात आले. म्हणजे पाऊस डोंगरावर अडेल. तो झिरपेल आणि विहिरींना पाणी वाढेल. समतल चरातून वाहून जाणारे पाणी छोटय़ा छोटय़ा बंधाऱ्यांमध्ये अडेल त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे उभारण्यात आले. कुठे दगड एकावर एक रचून गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. पाणी अडून राहील असे वेगवेगळ्या प्रकारची कामे ५२०९ गावांमध्ये पूर्ण झाली असल्याचा सरकारी यंत्रणेचा दावा आहे. निवडण्यात आलेल्या गावांपैकी निवडण्यात आलेल्या ६०२० गावांपैकी केवळ २०८ गावांमध्ये ३० टक्के किंवा त्यापेक्षा कमी काम झाले आहे आणि ५० टक्क्य़ांपेक्षा कमी काम झालेल्या गावांची संख्या आहे ३१९. एवढे सगळे काम पूर्ण झाल्यानंतरही पाऊस नसल्यामुळे सगळा मराठवाडा चिंतेत आहे.

२०१५ पासून जलयुक्तच्या कामाला सुरुवात झाली. ९०.४१ टक्के काम पूर्ण झाले आहे. १३९७ कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च झालेले आहे. शेततळ्यांसाठी मिळालेली रक्कम स्वतंत्र आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक काम झाले. १३ हजार २० शेततळी पूर्ण झाली. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक २८८० शेततळी आहेत. या तालुक्यातील खंडाळा नावाच्या गावात १०० शेततळी झाली. थोडासा पाऊस पडला तरीसुद्धा पाणीपातळी वाढू शकेल, असा दावा यंत्रणेतील अधिकारी करतात. पण मराठवाडय़ावर यावेळी पुन्हा पाऊस रुसला आहे. जर पाऊस झाला तर जलयुक्तच्या कामामुळे २० लाख १० हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन मिळणार आहे. म्हणजे पावसाचा खंड वाढला तर जलयुक्त शिवार योजनेतून केलेल्या विविध कामांतून त्यांना पाणी उपलब्ध होऊ शकते असे क्षेत्र म्हणजे संरक्षित सिंचन. कागदावरचे हे सगळे आकडे सध्या तहानलेल्या अवस्थेत आहे. मराठवाडा अजूनही कोरडाच आहे.

पाऊस आला तर भरभरून

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून सिंचनचा प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्यात आला होता. तेव्हाही मराठवाडा कोरडा होता. ज्याच्या-त्याच्या तोंडी सिंचनातील घोटाळे असा एकमेव विषय होता. राष्ट्रवादीने घोटाळे केल्याच्या आरोपावरील उत्तर म्हणून जलयुक्त शिवार ही योजना आणण्यात आली. त्यात नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात आले.त्यावरून टीका-टिप्पणीही झाली. या वर्षांत पाऊस आला तर विधानसभेच्या निवडणुकीत ‘भरभरून’ असेल अन्यथा जलयुक्तमधील उणेबाजू प्रचाराच्या केंद्रस्थानी येऊ शकते. पाऊस पडला तर जलयुक्तचा परिणाम जाणवेलच, असा दावा सरकारी यंत्रणा करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवर जलयुक्तचा परिणाम चांगला किंवा वाईट अशा दोन्ही बाजूंनी होऊ शकतो. त्यामुळे पाऊस आला तर भरभरून, अशी चर्चा राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहे.

कामे पूर्ण, बंधारे कोरडे

  • गावात पाणी अडविण्याची क्षमता जेवढी असेल ती क्षमता पूर्ण करण्यासाठी ८० टक्के काम झाले की, त्या गावाला सरकारदरबारी जलपरिपूर्ण असे घोषित केले जाते. अशी ५२०९ गावे आहेत.
  • २०१५-१६ मध्ये निवडलेल्या १६८५ गावांमध्ये शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. २०१६-१७ मध्ये १५१८ गावे निवडण्यात आली होती. त्यातील १५०४ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे, त्यातील १४ गावांमध्ये ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • २०१७-१८ मध्ये १२४८ गावांमध्ये जलयुक्तचे काम घेण्यात आले होते. त्यातील १०२४ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे, तर त्यातील १९७ गावांमध्ये ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

First Published on July 16, 2019 1:36 am

Web Title: jalyukt shivar scheme fail in marathwada abn 97
Next Stories
1 उस्मानाबादेतील ७५ हजार शेतकऱ्यांना खंडपीठात दिलासा
2 ‘तुमच्या मुलाला क्लास लावायचाय का?’
3 ‘जलशक्ती’तून मराठवाडा कोरडाच!
Just Now!
X