नांदेड उपविभागात केवळ दोनच जेसीबीद्वारे जलसंधारण

‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ असे उद्दिष्ट बाळगत वाटचाल सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानात नांदेड जिल्ह्यात हजारो कामे झाली असली तरी ‘थर्ड पार्टी ऑडिट’ झाले नसल्याने त्या कामांची गुणवत्ता गुलदस्त्यात आहे. हमखास पाणी येणाऱ्या भागातच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामांसाठी ‘नाम’मात्र यंत्रणा असल्याचे पुढे आले आहे. नांदेड उपविभागात गोदावरी, आसना आणि पर्यायाने पनगंगा या नद्यांचे पाणी हमखास येतेच, परंतु याच भागात अत्यंत तोकडय़ा यंत्रणेने जलसंधारणाची कामे सुरू आहेत.

नांदेड महानगराचा झपाटय़ाने विस्तार होतो आहे. चार वर्षांपूर्वी काही गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आली. आणखीही काही गावे प्रस्तावित आहेत. येत्या दशकात अर्धापूर, मुदखेड, मालेगाव ही शहरे नांदेडची उपनगरे म्हणून ओळखली जातील. या सर्व बाजूंनी वसाहती झपाटय़ाने विकसित होत आहेत. अर्थात याच भागात येत्या काळात लोकसंख्येची घनता कमालीची वाढणार आहे. पर्यायाने पाण्याची मागणीही कित्येक पटीने वाढेल. सद्यस्थितीत नांदेड, अर्धापूर व मुदखेड या तिन्ही तालुक्यांतील भूजलपातळी ३ मीटरपेक्षा अधिक घसरली आहे. या पाश्र्वभूमीवर मुखेड, लोहा, कंधार या दुष्काळी भागाबरोबरच नांदेड उपविभागातही जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर करावी लागणार आहेत आणि तशी संधीही उपलब्ध आहे.

दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील िलबगाव, वाघी ते गोदावरी नदी, वडेपुरी ते गोदावरी पात्र, गुंडेगाव, गुंडेगाव ते गोदावरी नदी आणि अर्धापूर तालुक्यातील लोणी ते येळेगाव, धामदरी ते डौर, चाभरा ते बोरगलवाडी हे नाले पुनरुज्जीवनासाठी निवडण्यात आले आहेत. पकी नांदेड तालुक्यात गुंडेगाव येथे ऑक्टोबर २०१५पासून शासकीय जेसीबी यंत्रणेने नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम सुरू आहे. हा नाला काकांडी माग्रे किकीपर्यंत जाईल; परंतु शासकीय यंत्रणा असल्याने कामाची गती अतिशय संथ असून पुढील वर्षभरात तरी हे काम पूर्ण होईल की नाही, याची शाश्वती देता येत नाही.

वडेपुरी येथे एक मशीन सुरू आहे; परंतु त्याचा लाभ लोहा तालुक्याला होणार आहे. पार्डी (ता. अर्धापूर) येथे लोकसहभागातून एका मशिनद्वारे काम सुरू आहे; पण या कामाला मर्यादा आहेत. अर्धापूर तालुक्यातील पार्डी, मेंढला हा भाग हमखास पाणी येणारा आहे. देळूब, गणपूर येथेही भाटेगाव कॅनॉलद्वारे पाणी सोडले जाते. दोन्ही नाले मेंढला नाल्याला मिळतात. इंग्रजी बाराखडीतील ‘वाय’ आकाराच्या सुमारे ३६ किलोमीटर अंतराच्या या नाल्यांतील गाळ काढून खोलीकरण झाल्यास अर्धापूर तालुक्याला पाण्याची कधीच कमतरता भासणार नाही; पण यंत्रणा तोकडी असल्याने या उन्हाळ्यात काम होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. सिंचनाचा भाग म्हणून ‘जलयुक्त’ राबविण्यात केली जाणारी कंजुषी अंगलट येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.