पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. मात्र, जलयुक्तच्या कामाला अधिकाऱ्यांना म्हणावी तशी गती देता आली नाही. जिल्ह्य़ात केवळ ६३ गावांमध्ये जलयुक्तचे काम पूर्ण झाले आहे.

गेल्या २ वर्षांपासून २२८ गावांमध्ये ही योजना सुरू आहे. पहिले वर्ष निविदा प्रक्रियेत गेले. दुसऱ्या वर्षांत या योजनेला वेग दिला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, अजूनही काम कमालीच्या संथगतीने सुरू आहे. मराठवाडय़ात जलयुक्तच्या कामात सर्वात मागे असणारा जिल्हा अशी औरंगाबादची ओळख बनू लागली आहे. या बाबत काय उपाययोजना केल्या जाणार, असे पालकमंत्री रामदास कदम यांना विचारले असता त्यांनी, ‘आम्हीही आता पुढे जाऊ’ एवढे सांगत वेळ मारून नेली.

जिल्ह्य़ात गेल्या वर्षी २२८ गावांमध्ये जलयुक्तचे काम करण्याचे ठरले होते. या वर्षी त्यात २२३ गावांची भर पडली. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती यंत्रणेत निर्माण झाली नाही. परिणामी ६८ कोटी रुपये खर्चून जिल्ह्य़ात ६३ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे. काम वेगाने पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच जून अखेपर्यंत १२५ गावांमधील काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. जिल्ह्य़ात २४१ कामांमधून ३९.७८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. २१ मशीनद्वारे सुरू असणारे हे काम संथगतीने सुरू असल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. औरंगाबाद तालुक्यात ६, पैठण ५, फुलंब्री ४, वैजापूर ८, खुलताबाद ५, सिल्लोड, सोयगाव व कन्नड या तालुक्यात प्रत्येकी ९ कामे पूर्ण झाली आहेत.