अधिकाऱ्यांच्या बैठकीत नुसताच काथ्याकूट; पाणी सोडण्याचे आदेश आज निघण्याची शक्यता

औरंगाबाद : नगर-नाशिक धरणातील पाणीसाठा आणि जायकवाडीतील पाणीसाठा यात १७२ दशलक्ष घनमीटरची तूट असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे नगर आणि नाशिक येथील धरणातून साधारणत: ६.०७ टीएमसी पाणी मराठवाडय़ाला मिळू शकते. १५ ऑक्टोबपर्यंत उर्ध्व गोदावरी आणि जायकवाडी यातील पाणीसाठय़ाचा अभ्यास करून त्रुटीच्या धरणांमध्ये समन्यायी पाणी वाटप करण्याचा आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेला होता. त्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर काथ्याकूट केला, पण न्याय्यहक्काचे पाणी वरच्या धरणातून सोडावे, असा निर्णय काही आज जाहीर झाला नाही.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर म्हणाले की, येत्या एक-दोन दिवसांत जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी प्राधिकरणाच्या आदेशानुसार तिसरी प्रणाली लागू केली जाईल आणि त्यानुसार कार्यवाहीचे आदेश काढले जातील.

नगर-नाशिकमधील धरणांमध्ये असणारा पाणीसाठा आणि त्यांनी खरिपात केलेला पाणीवापर गृहीत धरून नगर व नाशिक जिल्ह्य़ातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्यायी पाणीवाटप कसे करता येईल, यावर चर्चा केली. ही चर्चा सुरू असतानाच नगर जिल्ह्य़ातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जायकवाडी धरणास पाणी सोडू नये, अशी विनंती करणारे निवेदने कार्यकारी संचालकांना दिले.

जायकवाडीच्या मूळ योजनेतच त्रुटी असल्यामुळे मेंढेगिरी समितीने केलेल्या शिफारशींवर अवलंबून असणारा जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश मान्य केला जाऊ नये, असे ते सांगत होते. दुसरीकडे मराठवाडय़ातला तीव्र दुष्काळ लक्षात घेता जायकवाडी धरणात पाणी सोडणे आवश्यक झाले आहे. सोमवारी जायकवाडी धरणात केवळ ३६.६३ टक्के पाणीसाठा उपलब्घ होता. ७९५.१८ दलघमी पाणी जायकवाडीत असल्यामुळे वरच्या धरणातील पाणी आणि जायकवाडीतील पाणी याचा सारासार विचार केला जावा आणि त्यानुसार पाणीवाटप केले जावे, असे सांगितले जात होते.

करंजवन (९३.८९ टक्के), वाघाड (९९.६५), ओझरखेड (८८.०७), पालखेड (४९.४८), गंगापूर (८८.६७), गौतमी (९९.७२), कश्यपी (९९.७०), कडवा (९४.१२), दारणा (९२.९७), भावली (१००), मुकणे (७३.९), नांदूर मधमेश्वर (८१.७२), भंडारदरा (९३.१६), निळवंडे (८५.५९), मुळा (६६.६२ टक्के) अशी पाणीपातळी जायकवाडीच्या उर्ध्व धरणात होती. खरिपाचा वापर गृहीत धरून जायकवाडी धरणात साधारणत: सहा टीएमसीची तूट असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हे पाणी वरच्या धरणातून जायकवाडीस मिळू शकते. मात्र, तसा निर्णय सोमवारी घेतला गेला नाही. कार्यकारी संचालकांच्या स्तरावर हा निर्णय होईल, असे अपेक्षित आहे. मात्र, निर्णय का लांबवला गेला, याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही.