नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या जोरदार वृष्टीमुळे जायकवाडीकडे पाणी झेपावले आहे. नांदूर-मधमेश्वरमधून १ लाख ३२ हजार क्युसेक वेगाने पाणी येत असल्याने नदीकाठच्या ४३ गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील नदीकाठी राहणाऱ्या काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी सुरू होती. उद्या सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ अपेक्षित आहे. सध्या हे धरण शून्य टक्क्य़ापेक्षा खाली होते.

नाशिक जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वरील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून सायंकाळी १ लाख ३२ हजार क्युसेक वेगाने पाणी सुरू होते. दारणा धरण समूहात ३३ हजार ३९४, नागमठाण येथून २१ हजार २००, गंगापूर धरण समूहातून २९ हजार ९६१ तर पालखेडमधून १४ हजार ८३३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. २०१६ मध्ये २ लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. परिणामी नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला होता. आज दुपारी १२च्या सुमारास जायकवाडीकडे येणारा पाण्याचा वेग वाढला. तो १ लाख ५६ क्युसेक एवढा होता. लाखाच्या पुढे विसर्ग गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या. गंगापूर, पैठण व वैजापूर तालुक्यातील ४३ गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत. गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या. वैजापूर तालुक्यातही लक्ष्मीकांत साताळकर, गंगापूरसाठी संदीप जाधवर तर पैठण तालुक्यासाठी केशव नेटके यांची नियुक्ती करण्यात आली. रात्रीतून पाणी जायकवाडीत येण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. आपत्ती काळात कोणी कोणते काम करावे, याबाबतचेही नियोजन करण्यात आले. स्थानिक पातळीवर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर लष्कराच्या स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. वेगाने पाणी येत असले, तरी जायकवाडीच्या पात्राचा संकोच फारसा झालेला नसल्याने पूरपरिस्थिती सहजपणे हाताळली जाऊ शकेल, असा दावा सिंचन विभागातील अधिकारी करत आहेत. उद्या दुपापर्यंत जायकवाडीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होईल. दरम्यान, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्य़ातील दिवसभर पावसाच्या सरी येत होत्या. मात्र, मोठा पाऊस म्हणता येईल, अशी स्थिती नव्हती.