गोदावरी पाटबंधारे मंडळाचा निर्णय

जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबर रोजी ८२.६१ टक्के पाणीसाठा असल्याने या वर्षी नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील धरणांवर समन्यायी तत्त्वानुसार पाणी वितरित करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाने घेतला आहे. औरंगाबाद येथे या अनुषंगाने सोमवारी बैठक घेण्यात आली. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या १० (ई) या कलमान्वये जायकवाडीमध्ये ६५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाणीसाठा असेल तर उध्र्व भागातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, असा नियम आहे. न्यायालयानेही हे तत्त्व मान्य केले असल्याने वरून पाणी सोडले जाणार नाही.

दरवर्षी समन्यायी पाणीवाटपासाठी १५ ऑक्टोबर रोजीचा जलसाठा गृहीत धरला जातो. या साठय़ाच्या आधारे वरच्या धरणातून पाणी सोडायचे किंवा नाही, हे ठरविले जाते. या वर्षी जायकवाडी धरणात चांगले पाणी असल्याने वरच्या धरणातून पाणी सोडणे आवश्यक नसल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. खरिपामध्ये ८६० दशलक्ष घनमीटर पाणी नगर व नाशिककरांनी वापरल्यास जायकवाडीच्या प्रकल्प अहवालात मान्यता आहे. या दोन्ही जिल्ह्य़ांत ५७६ दलघमी पाणी वापरण्यात आले. जायकवाडीमध्येही पाणी असल्याने माजलगाव व औष्णिक विद्युत केंद्रासाठी तसेच पिण्याचे पाणी, असा १३३.८५ दलघमी पाणीवापर मराठवाडय़ात झाला आहे. पाणी उपलब्धता लक्षात घेता वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय कार्यकारी संचालक च. आ. बिराजदार यांनी दिला.