औरंगाबाद : कुंभेफळ येथील लोककला केंद्रचालकास वर्तमानपत्रात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देत दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या साप्ताहिकाच्या पत्रकारासह त्याच्या साथीदारास सिडको पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई मंगळवारी सकाळी सिडकोतील हॉटेल कृष्णा फास्टफुडजवळ करण्यात आली असल्याची माहिती निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. शरद भीमराव दाभाडे असे खंडणीखोर पत्रकाराचे, तर विजय रामभाऊ जाधव असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.

बाबासाहेब किसनराव गोजे यांचे कुंभेफळ येथे साई लोकनाटय़ कला मंदिर नावाने कलाकेंद्र आहे. शरद दाभाडे, विजय जाधव यांनी बाबासाहेब गोजे यांना तुमच्या कलाकेंद्रात अवैध धंदे चालत असून त्याची बातमी ‘भ्रष्टाचार बंदी’ या आमच्या साप्ताहिकात छापून तुमची बदनामी करतो, तसेच तुमचे कलाकेंद्र कायमचे बंद करून टाकेन, अशी धमकी दिली होती. कलाकेंद्र सुरू ठेवायचे असेल तर आम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून सतत खंडणीची मागणी करीत होते.

खंडणीबहाद्दरांच्या त्रासाला कंटाळलेल्या बाबासाहेब गोजे यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हडको एन-११ परिसरातील हॉटेल कृष्णा फास्टफुडजवळ सापळा रचून शरद दाभाडे, विजय जाधव यांना अटक केली. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी कार आणि रोख ३० हजार रुपये जप्त केले आहेत.