13 August 2020

News Flash

टाळेबंदीत बचत गटांचा प्रवास समूह साहाय्यतेच्या दिशेने

धान्य बँकेच्या मदतीबरोबरच मुखपट्टय़ा बनविण्यातही अग्रेसर

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख

राज्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एक लाख ३८ हजार बचत गटातील १६ लाख महिलांनी स्वयंसाहाय्यता ते समुदाय साहाय्यतेचा साकव उभा केल्याने टाळेबंदीमध्ये कोणी उपाशी राहिले नाही. शहरी भागातील बचत गटांनी सुमारे १६ लाख मुखपट्टय़ा बनविल्या तसेच वंचित कुटुंबापर्यंत धान्य आणि शिधा पोहचविण्याचे काम केले. बचत गटाचा राज्यातील व्यवहार हा ३५०० कोटी रुपयांचा असून कर्ज परतफेडीचे प्रमाण ९९ टक्के एवढे आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमामुळे बचत गटांना दिलेले कर्ज हप्ते भरण्यास मुभा दिला असल्याने त्याचा लाभ झाला. या काळात महिलांनी गावकऱ्यांना ऑनलाइन व्यवहाराचे शिक्षण तर दिलेच शिवाय अनेक गावांमध्ये गरजूंना मदत केली. स्वत:ची मदत करण्याबरोबर गावकऱ्यांना मदत करण्यात बचत गटातील महिला पुढाकार घेत होत्या, असा अनुभव या काळात माविम अधिकाऱ्यांना आला.

माविमच्या कुसुम बाळसराफ म्हणाल्या, ‘दुर्गम भागातील महिला एकमेकींची काळजी घेत होत्या. कोणी उपाशी राहणार नाही, याचाही विचार त्यांच्यामध्ये सुरू होता. बचत गट हा केवळ आर्थिक उपक्रम नाही, याचा प्रत्यय या काळात महिलांनी दिला. टाळेबंदीच्या काळात शिवभोजन योजनेच्या मदतीने १५ हजार गरिबांना जेवण पुरविले. बचत गटाच्या नोंदणीकृत फेडरेशन माध्यमातून केलेली मदत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: नंदुरबार जिल्ह्य़ात जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये दोन-तीन पिके घेतात. सगळे धान्य बाजारात विकून  त्यामुळे बहुतांश कुटुंबांकडे धान्य नसल्याचे दिसून आले. त्यावर धान्य बँक ही योजना सुरू करण्यात आली. शहादा तालुक्यात ४१ महिलांनी पाच क्विंटल मका आणि चार क्विंटल गहू जमा केला. ते धान्य ११ गरजूंना देण्यात आले. त्याला व्याजही लावण्यात आले. म्हणजे चार किलो धान्याला हंगामात दोन किलो धान्य अधिक द्यायचे. या समूह धान्य बँकांचा धान्याचा व्याजदर  टाळेबंदीमध्ये चार किलोस एक किलो असा करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून टाळेबंदीमध्ये कोणी उपाशी राहिले नाही. समूह धान्य बँक आता अधिक चांगली होत असल्याचाही दावा माविमच्या अधिकारी करतात.

रोजगार गेल्यानंतर आधार

भंडारा जिल्ह्य़ात रास्त भाव दुकानांमधील वस्तू पुरविण्यासाठीही बचत गटातील महिलांनी मदत केली. वाशीम जिल्ह्य़ात कोविड केअर सेंटरमधील ४५० रुग्णांना जेवण पुरविण्याचे काम बचत गटाने केले. यवतमाळ जिल्ह्य़ातील गरीब कुटुंबातील विद्या नरवडे यांनी इतरांना मदत करायची म्हणून १०० जणांना धान्य पुरविले. काही जणी धुणी-भांडी करत. करोनाकाळात त्यांचे काम सुटले. अशा महिलांस बचत गटांनी मदत केली आणि त्यांनी भाजी विक्रीचा व्यावसाय सुरू केला. अशा अनेक जणींनी मदत केल्यामुळे एकमेकींना साहाय्य करण्याचे सूत्र अधिक मजबूत झाले. बचत गटातील महिलांनी एक रुपयाची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत  करण्याचे ठरविले आणि ११ लाख ३५ हजार रुपये जमा केले. परभणी येथील महिला बचत गटाने दहा हजार मुखपट्टय़ा तयार केल्या.

महिलाच एकमेंकीची मदत करण्याची प्रक्रिया टाळेबंदीच्या काळात अधिक दृढ झाली असल्याने येत्या काळातही बचत गटांचे व्यवहार अधिक पारदर्शी आणि ग्रामीण वीण मजबूत करणारी असेल, असा दावा केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2020 12:25 am

Web Title: journey of self help groups in the direction of group assistance abn 97
Next Stories
1 ‘करिना’ने अन्नपाणी सोडलं; सिद्धार्थ उद्यान प्रशासनानं केली करोना टेस्ट
2 ‘समृद्धी’चा वेग पूर्ववत
3 करोना परिस्थितीने छळले, मरणातून केली सुटका
Just Now!
X