कनिष्ठ महाविद्यालयीन (जुक्टा) च्या वतीने प्रलंबित वैयक्तिक मान्यता मिळाव्यात यासाठी १७ मे रोजी लातूर उपसंचालक कार्यालयास ताळे ठोको आंदोलन करण्यात येणार होते. हे आंदोलन तूर्तास काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे असे निवेदन महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव यांनी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांना दिले आहे.

लातूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे २०१२ ते डिसेंबर २०१५ पर्यंतचे वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील लातूर विभाग वगळता अन्य विभागांतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव मंजूर केले आहेत, मात्र लातूर विभागातीलच २०० प्रस्ताव जाणीवपूर्वक निकाली काढले जात नाहीत. वैयक्तिक मान्यता द्याव्या म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने (जुक्टा) अनेक वेळा शिक्षण उपसंचालकांशी लेखी व तोंडी चर्चा केली. मात्र याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे वैयक्तिक मान्यतेचा हा प्रश्न आणखी गंभीर बनत गेला.

२ मे रोजी विभागातील ३०० शिक्षकांनी उपसंचालक कार्यालय लातूर येथे धरणे आंदोलन करून वैयक्तिक मान्यतेचा हा गंभीर बनत चाललेला प्रश्न १५ दिवसांच्या आत निकाली काढावा अन्यथा १७ मे रोजी उपसंचालक कार्यालयास ताळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक महासंघाने दिला होता. परंतु शिक्षक महासंघासोबत शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्ताची सकारात्मक चर्चा झाली आणि हा प्रश्न येणाऱ्या दहा दिवसांत निकाली काढू असे आश्वासन दिल्यामुळे नियोजित ताळे ठोको आंदोलन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे, असे निवेदन उपसंचालकास देण्यात आले. प्रलंबित वैयक्तिक मान्यतेचा प्रश्न लवकर निकाली न निघाल्यास लवकरच पुढील आंदोलनाची तारीख कळवण्यात येईल आणि आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव यांनी सांगितले. या निवेदनाला प्रा. शिवराम  सूर्यवंशी, प्रा. काकासाहेब िशदे, प्रा. ननावरे, प्रा. शिवाजी िशदे, प्रा. जाधव, प्रा. बचाटे बाळासाहेब, प्रा. संतोष हुडगे, प्रा. मजगे संदीप, प्रा. जब्बार मोमीन, प्रा. संदीप पाटील, प्रा. संतोष शेळगे, प्रा. हुडगे पवित्रकुमार, प्रा. सुंदर मुकुंद, प्रा. तनमोर शरद, प्रा. देव विनायक, प्रा. नागरगोजे राजेंद्र आदी शिक्षकांनी मान्यता दिली.