महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीसाठी स्वतंत्र अभियंत्यांची पदे निर्माण करावीत, ही मागणी रेटत कनिष्ठ अभियंता संघटनेचे अधिवेशन २८ व २९ नोव्हेंबरला श्रीहरी पॅव्हेलियन येथे होणार आहे. जलसंपदा, बांधकाम व वीज क्षेत्रातील ४ हजार अभियंता प्रतिनिधी या अधिवेशनास येणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह ८ मंत्री या अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव गायकवाड यांनी मंगळवारी दिली.
पदवीधारक अभियंत्यांची सर्व रिक्त पदे भरावीत, उपविभागीय व कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आढावा घेऊन ती पदे भरावीत, पदवीधारक कनिष्ठ अभियंत्यास ३०-३५ वष्रे सेवा करूनही पदोन्नती मिळालेली नाही, त्यांना न्याय मिळावा या मागणीसह मनरेगातून सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नव्या योजनेसाठी स्वतंत्र अभियंता नेमावेत, अशी मागणी न्यायालयातही करण्यात आली होती. तशी यंत्रणा उभारण्याचे न्यायालयाचे निर्देशही मिळाले आहेत. त्यांची स्वतंत्र आस्थापना निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अधिवेशनास सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह ८ मंत्री उपस्थित राहणार आहेत.