न्यायव्यवस्थेतमार्फत मोठय़ा प्रमाणावर खटल्यांचे निकाल लागतात. मात्र त्यातून न्याय किती जणांना मिळतो, यावर गंभीर विचार करण्याची गरज न्या. अंबादास जोशी यांनी व्यक्त केली.
श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘न्यायप्रक्रियेतील सामाजिक सहभाग’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य अनिरुद्ध जाधव, ज्येष्ठ विचारवंत नागोराव कुंभार, अजय ठक्कर, धर्मराज हल्लाळे होते. न्या. जोशी म्हणाले, घटस्फोट मिळावा यासाठी १० वर्षे न्यायालयात खेटे घातल्यानंतर निकाल लागतो. मात्र, त्यांचे उमेदीचे वर्ष वाया गेले तेव्हा निकाल लागला तरी न्याय मिळाला का, याचे उत्तर मिळत नाही. न्यायप्रक्रियेत समाजाचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या देशात इंग्रजपूर्व काळापासून इंग्रजांनी निर्माण केलेल्या कायद्याच्या तोडीची न्यायव्यवस्था अस्तित्वात होती. शहाजी राजे, शिवाजीमहाराजांच्या काळात जिजाऊ भोसले या न्यायनिवाडा करत असत, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. सर्वदूर न्याय देण्यासाठी समाजाचा सहभाग अतिशय गरजेचा आहे. शिवाजी महाराजांची समाजाला गरज आहे, मात्र त्यांनी शेजाऱ्यांच्या घरी जन्म घ्यावा, ही मानसिकता समाज दुर्बल बनवतो. समाज हा न्यायप्रिय असायला हवा. त्यासाठी कर्तव्यभावना समाजात रुजली पाहिजे. न्यायव्यवस्था ही मूलभूत न्यायप्रक्रियेला लावलेला कृत्रिम अवयव आहे. त्यामुळे या व्यवस्थेकडून नैसर्गिक न्याय मिळण्याची अपेक्षा करणे हे अवास्तव असल्याचे ते म्हणाले. कार्यपालिकेच्या भूमिकेबद्दल लोकशाही व्यवस्थेतील मर्यादा लक्षात घेऊनच न्यायपालिकेला आपली भूमिका बजावावी लागते.
सध्याची शिक्षणपद्धती ही स्मरणशक्तीची परीक्षा घेणारी आहे. ज्ञानवृद्धीवर भर दिला जात नाही. गुणवत्तेचा मापदंडच जर चुकीचा असेल तर न्यायाची अपेक्षा कशी करायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अनुभवापेक्षा केवळ पदवीला महत्त्व दिले जाणार असेल तर या व्यवस्थेचा गाडा कोणत्या दिशेने जातो आहे, हे सहज समजण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी अजय ठक्कर यांनी सेवालय या सेवाभावी संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांना संस्थेतर्फे ५१ हजार रुपये निधी सुपूर्द केला. पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी प्रास्ताविक केले.