जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारच्या औरंगाबादमधील कार्यक्रमापूर्वी भाजप आणि कार्यक्रमाचे आयोजक यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे. शहरातील नियोजित कार्यक्रमाला देण्यात आलेले सभागृह नाकारल्यामुळे ‘संविधान बचाव युवा समितीने भाजप विरोधी घोषणाबाजी सुरु केली. डाव्या चळवळीतील विद्यार्थी संघटना, दलित चळवळीतील संघटना आणि समविचारी संघटनांनी एकत्रितपणे ‘संविधान बचाव युवा परिषद’ आयोजित केली आहे. औरंगाबादमध्ये ७ ऑगस्टला हा कार्यक्रम पार पडेल. मात्र औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भूमिकेमुळे या कार्यक्रमापूर्वी वाद निर्माण झाला आहे.

शहरातील संत तुकाराम नाट्य मंदिरात युवा परिषदेचा नियोजित कार्यक्रम पार पडणार होता. त्यासाठी महापालिकेला भाडे रक्कम देऊन संविधान परिषदेने रीतसर सभागृह बूक केले. कार्यक्रमाला संमती दिल्यानंतर आता नियोजित सभागृहाऐवजी पर्यायी सभागृहामध्ये हा कार्यक्रम घ्यावा, अशी भूमिका पालिकेने घेतली आहे. त्यामुळे कन्हैया कुमारचा औरंगाबाद दौरा चर्चेत आला आहे. औरंगाबाद महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पूर्वसूचना न देता नियोजित सभागृह नाकारणं ही राजकीय कुरघोडी असल्याचं बोललं जात आहे.

महापालिकेने सभागृहाच्या दुरुस्तीचे काम असल्याचे कारण देत पर्यायी सभागृह देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र संविधान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट मान्य नाही. किमान दहा दिवसांपूर्वी पालिकेने आम्हाला याबाबत कळवायला हवं होतं. कार्यक्रमाला येणारी गर्दी लक्षात घेता, पालिका सांगत असलेलं सभागृह सोईच नाही. वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर पालिका परवानगी नाकारते. पालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राजकीय दबावातून हे होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात परिषदेचे पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. महापौर भगवान घडमोडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. सभागृह देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार प्रशासनाचा आहे. मला सभागृह दिलेलं आणि नाकारलेले काहीही माहिती नाही, असे ते म्हणाले.