औरंगाबाद पालिकेकडून नाटय़गृह दुरुस्तीचे कारण; डाव्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध

संविधान बचाव युवा परिषदेच्या वतीने आयोजित ७ ऑगस्ट रोजी विद्यार्थी नेता कन्हय्याकुमार याच्या भाषणासाठी संत तुकाराम नाटय़गृहात कार्यक्रम करण्यास दिलेली परवानगी महापालिकेने बुधवारी रात्री अचानक रद्द केली. नाटय़गृह दुरुस्तीचे कारण पुढे करून दिलेली परवानी काढून घेण्याच्या या कृतीच्या विरोधात गुरुवारी डाव्या संघटनांनी उपोषण करून निषेध नोंदविला.‘वरून आदेश होते’ म्हणून परवानगी रद्द करण्यात आल्याचे महापालिका मालमत्ता विभागाच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याने ते संतापले.

वर्गणी गोळा करून संत तुकाराम नाटय़मंदिर या सभागृहाच्या भाडय़ाचे ५४ हजार २४० रुपयांचे शुल्क महापालिकेमध्ये जमा केले होते. २ ऑगस्ट रोजी पवन गायकवाड या कार्यकर्त्यांने पवन इव्हेन्ट्स या नावे महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यात संविधान बचाव युवा परिषद घेण्यात येणार आहे, असे कळविले होते. त्यासाठी रक्कम भरल्यानंतर त्याच दिवशी कार्यक्रम घेण्यास महापालिकेच्या वतीने परवानगीचे पत्र देण्यात आले होते. मात्र, बुधवारी रात्री संत तुकाराम नाटय़मंदिर दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने संत एकनाथ नाटय़गृहात कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र दिले. त्यामुळे कार्यकर्ते चिडले. संत तुकाराम नाटय़गृहाच्या शेजारी असणाऱ्या शाळेचे प्रांगणही मिळणार होते. मात्र, महापालिकेच्या निर्णयामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अधिक आर्थिक भार पडावा, असा उद्देश असल्याचे दिसून येत असल्याचे संयोजक अ‍ॅड. अभय टाकसाळ म्हणाले. महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात आज कार्यकर्त्यांनी उपोषण करून निषेध नोंदविला. या परिषदेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून निधी एकत्रित केला होता. त्यातून कन्हय्याकुमार याच्यासह अन्य चौघांची विमानाची तिकिटे तसेच फलक व बॅनरवरही मोठा खर्च करण्यात आला होता. आता अचानकपणे स्थळ बदला, असे महापालिकेने कळविल्यामुळे त्यांची अडचण झाली. संत तुकाराम नाटय़गृहाची परवानगी नाकारण्यामागे भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या सूचना होत्या, असा दावा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गुरुवारी महापालिकेसमोरील उपोषणामध्ये दीपक केदार, सचिन तिवारी, राजेश साबळे, मधुकर खिल्लारे, किरण तुपे यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपोषण केले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते नासेर सिद्दिकी यांनी उपोषणास पाठिंबा दिला.