राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांना ‘कर्मयोगी’ अशी उपाधी देत, पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात झालेल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणात शरद पवार देखील समान वाटेकरी आहेत, असे गौरोद्गार अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढले. औरंगाबादमधील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात शरद पवारांवरील ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट इनिग्मा’ या चरित्र ग्रंथाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. शेषराव चव्हाण यांनी ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट इनिग्मा’ हा चरित्रग्रंथ लिहिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देखील शरद पवार यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. कोणतीही संकटाची परस्थिती ते चांगल्या पद्धतीने हाताळू शकत होते. मुंबई बॉम्बस्फोट, लातूर भूकंप, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर या घटना त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्या. त्यांच्या जीवन चरित्रात या सर्व गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. त्यावरून त्यांच्या कामाचा अंदाज येतो असे मनमोहन सिंग म्हणाले.

शरद पवारांचे बारामती मॉडेल देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. औद्योगिक धोरणांसंदर्भात पवार यांची भूमिका महत्वाची आहे. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात आम्ही सोबत काम केले त्यावेळी त्यांचा सल्ला महत्वाचा असायचा. अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासंदर्भात जे धोरण राबवण्यात आले त्याला पुण्याच्या मराठा चेंबरमधील भाषणातून पवार यांनी जाहीर समर्थन दिले होते. त्यावेळी जाहीर समर्थन देणारे पवार एकमेव नेते होते. म्हणूनच उदारीकरणाच्या निर्णयाचे जे यश आहे त्यात त्यांचा समान वाटा असल्याचं मनमोहन सिंग म्हणाले. सर्वाधिक यशस्वी आणि कल्पक असे कृषिमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.