21 November 2019

News Flash

कस्तुरबांच्या कपडय़ांच्या ‘जुने’पणाला नवी चकाकी

औरंगाबादमध्ये पुरातत्त्व विभागाचे काम

|| बिपीन देशपांडे

औरंगाबादमध्ये पुरातत्त्व विभागाचे काम

कस्तुरबा गांधी यांच्या साडी-चोळीसह इतर कपडय़ांना औरंगाबादच्या पुरातत्त्व विभागाने रासायनिक प्रक्रिया करून नवी चकाकी दिलेली आहे. शंभर वर्षांपूर्वी चरख्यावर सूत कताई करून काढलेल्या धाग्यातून तयार केलेल्या या कपडय़ांमधील ‘जुने’पण आणि  ‘खादी’पण जपण्याचे आव्हानात्मक काम अत्यंत नाजूकपणे हाताळण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.

पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी परिधान केलेले कपडे जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यातील कस्तुरबांच्या काही साडय़ा, चोळी, हातरुमाल या कपडय़ांवर एकप्रकारचा काळपट रंग चढू लागला होता. हा काळपटपणा दूर करून ती वस्त्रे आहे त्या स्वरूपात जतन व्हावीत म्हणून त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया  करण्यात आली. कपडय़ातील जुनेपण कायम राहील, त्याला नवी चकाकी येईल,असे काम करण्याचे औरंगाबादच्या पुरातत्त्व विभागास सोपविण्यात आले होते.

महिनाभराच्या कालावधीत सर्व कपडय़ांवर ही प्रक्रिया करण्यात आली. त्यातून या कपडय़ांमधील ‘जुने’पण कायम राहील, याची खबरदारी घेण्याचे आव्हान होते. प्रत्येक धागा-न-धाग्यावर जपूनच लेपन करण्यात आले. या रासायनिक लेपनामुळे कस्तुरबांच्या कपडय़ांचे आयुष्य दीर्घकाळ टिकणार आहे. शिवाय कपडे ज्या ठिकाणी ठेवून जतन करण्यात येणार आहेत, तेथील तापमानाचाही विचार रासायनिक लेपन प्रक्रिया करताना करण्यात आल्याचे पुरातत्त्व कार्यालयातील रसायनतज्ज्ञ विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्र यांनी सांगितले.

गतवर्षीही कस्तुरबांच्या पाच-सात कपडय़ांवर येथील रासायनिक प्रयोगशाळेत नवे लेपन करण्यात आले होते. त्यासाठी नॉन आयानिक डिर्टजट, अमोनिया आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड या रसायनांची मिश्रणे वापरण्यात आली. त्यामुळे कस्तुबाच्या कपडय़ावर काळाने निर्माण झालेली पुटे बाजूला झाली आहेत. या वर्षीही १२ ते १५ कपडय़ांना रासायनिक प्रक्रियेतून नवी चकाकी देण्यात आली आहे. हे काम अत्यंत नाजूक पद्धतीने हाताळण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.   – श्रीकांत मिश्र, उपअधीक्षक, रसायनतज्ज्ञ विभाग

First Published on July 2, 2019 1:08 am

Web Title: kasturba gandhi mahatma gandhi mpg 94
Just Now!
X