सुहास सरदेशमुख

‘बिनचिपळीचा नारद’ अशी उपमा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा मुका घेणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांनी मंगळवारी वयाची शंभरी पूर्ण केली. पण त्यांचा उत्साह, राजकीय निर्धार अद्यापही दांडगा आहे. ते म्हणतात, ‘सध्याचे राजकारणी ‘म्होतूर’ लावत फिरत असतात. ते कोणत्या पक्षात असतात, हे त्यांनाही माहीत नसते. त्यामुळे एक पक्ष आणि एकच झेंडा घेऊन फिरणाऱ्या आमच्यासारख्याचे फार बळ नसले तरी आम्ही लढत राहू, जय क्रांती म्हणत राहू.’

Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Female Student Death by Suicide
“सॉरी ताई..”, म्हणत १७ वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं, लैंगिक शोषण झाल्याचा आरोप
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

मंगळवारी राज्यभर समाजमाध्यमांतून गुरुपौर्णिमेचे संदेश फिरत असताना धोंडगे यांनी सकाळी ‘माय-पौर्णिमा’ साजरी केली. ‘माय म्हणजे आई, ती सगळ्यांची गुरू. जर पौर्णिमाच साजरी करायची असेल तर ती ‘माय-पौर्णिमा’ म्हणून साजरी करायला हवी. आमच्या सर्व संस्थांमध्ये आम्ही ‘माय-पौर्णिमा’ साजरी करतो’ असे धोंडगे म्हणाले. ‘सध्याच्या राजकीय संस्कृतीत ना सती सावित्री राहिली आहे, ना सत्यवान. सगळेच जण इकडून-तिकडून जातात. तत्त्वाचे राजकारण राहिलेच नाही. ‘म्होतूर’ करायला निघाले सगळे. त्यामुळे आमच्यासारख्यांचा पक्ष दुबळा होतो, पण आम्ही लढत राहू. सध्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा जोर आहे. त्याला विरोध करावा लागेल. मी शंभरीत असलो तरी शेवटपर्यंत ते करीन. तत्त्वाचे राजकारण करणारे मोजकेच आहेत. पण रंग बदलणारे खूप. सरडय़ासारखे रंग बदलतात. तत्त्वाचे राजकारण करायचे असेल तर ‘म्होतूर’ संस्कृती थांबायला हवी’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

१९५७ ते १९९५ अशा दहा निवडणुका आणि ११ मुख्यमंत्री पाहिलेले केशवराव धोंडगे यांनी ४० पुस्तके लिहिली आहेत. विधिमंडळात त्यांनी केलेली भाषणे, शब्दकोटय़ा, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी ही सारी आयुधे वापरताना भल्याभल्यांची भंबेरी उडवली. तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनादेखील त्यांनी ठणकावले होते. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार मोरारजीभाई देसाईंना कापूस एकाधिकार योजनेसंदर्भात भेटायला गेले होते. तेव्हा मोरारजीभाईंनी आमदारांना शहाणपणाचे बोला, दलाली करू नका, असे सुनावले. तेव्हा भाई धोंडगे म्हणाले होते, ‘बळीराजाचे प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहोत. माझ्या शूर मतदारांनी निवडून दिल्याने त्यांच्या कृपेने आलो आहोत. तुमचे फोटो लावून विजयी झालेलो नाही. पंतप्रधानांच्या पदाला शोभेल असे बोला’ असे सुनावल्याची आठवण अजूनही त्यांचे समर्थक सांगतात.

देशातील आणीबाणीला अनुशासन पर्व असे गौरविणाऱ्या विनोबा भावेंना पत्र लिहून त्यांनी ठणकावले होते. १९ फेब्रुवारी १९७६ मध्ये लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘सध्याची शासकीय आणीबाणी आणि आपले अनुशासन पर्व लक्षात घेता आपले ‘सूक्ष्मसिंचन’ यापुढे चालू ठेवण्यासाठी सध्याचे मौन व्रत चालू राहील, असे आपल्या आश्रमवाणीने प्रसृत केले.’ टीका करताना केशवरावांची भाषा अशी टोकदार असे. बोलण्यातला बेरकीपणा, ग्रामीण ढंगाची शैली आजही कायम आहे.

वयाच्या शंभरीत दूरध्वनीवरून संभाषण साधले तर पहिला शब्द येतो ‘जय क्रांती’. या नावाने साप्ताहिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.

कधी आक्रमक, कधी विनोदी

औरंगाबादला आकाशवाणी केंद्र व्हावे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, परभणीत कृषी विद्यापीठ व्हावे अशा अनेक मागण्या केशवराव धोंडगे यांनी लावून धरल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी विरोधकांना घाम फोडला होता. पण त्यांचे बोलणे मोठे विनोद निर्माण करणारे होते. महाराष्ट्राच्या भेटीला आलेल्या इंग्लंडच्या राणीला वस्त्रालंकार आणि नथ भेट देण्यात आली होती. त्यावरून धोंडगे यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात हशा पिकला होता.

‘काँग्रेसमध्ये अखिल भारतीय असे काय राहिले आहे?’

यशवंतराव चव्हाणांपासून ते सुधाकरराव नाईकांपर्यंतच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार जवळून पाहणाऱ्या केशवराव धोंडगे यांचे शरद पवारांवर ‘विलक्षण प्रेम’. आजही ते पवारांच्या राजकारणावर बोलले, ‘म्होतूर संस्कृतीत काय बोलणार? उडदामाजी काळेगोरे. त्यांनी तरी कुठे एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. पण ते आमचे दोस्त.’ शंकरराव चव्हाण यांच्याशी केशवरावांचे कधीच जमले नाही. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत अशोकराव चव्हाणांचे पराभूत होणे त्यांना चुकीचे वाटत होते. काँग्रेसचा सर्वत्र ऱ्हास होत आहे. त्या राजकारणाविषयी काही म्हणायचे आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, ‘त्यांच्यात आता अखिल भारतीय असे काय राहिले आहे? पण अशोकरावांनी चांगले काम केले आहे.

तीन दशके विजय

१९५७ साली कंधार विधानसभा क्षेत्रातून ‘खटारा’ या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या केशवरावांनी तीन दशके विजय मिळविला. १९९० पर्यंत ते विजयी होत होते. १९६२चा त्याला अपवाद होता. काँग्रेसच्या साहेबराव सकोजी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९६७ ते १९९० अशा सलग चार निवडणुका ते जिंकले.