व्यवसायात देणे झाले म्हणून स्वत:च्या अपहरणाची शक्कल लढवून पोलिसांना कामाला लावणाऱ्या तरुणाने सोमवारी मात्र आपण स्वत:च हा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली.
विक्रम पांचाळ (वय १९) या तरुणाने पाऊस पडावा, या साठी आपला नरबळी देण्यात येत असून त्यासाठीच आपले अपहरण करण्यात आल्याचे एसएमएसद्वारे मामाला कळवले होते. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. मात्र, सोमवारी पोलीस ठाण्यात हजर होऊन व्यवसायात देणे झाले म्हणून आपणच आपल्या अपहरणाची शक्कल लढवल्याची कबुली विक्रमने दिली. फसवणूकप्रकरणी विक्रमच्या विरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
विक्रम हा जुगल सोनी यांच्यासमवेत एलइडी बल्ब विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याचे वडील हयात नाहीत. त्याला लहान भाऊ आहे. त्याला व्यवसायात ४ लाख रुपयांचे देणे झाले होते. त्यामुळे तो गांगरून गेला व यातून बचाव करण्यासाठी त्याने आपले अपहरण झाल्याचा एसएमएस शुक्रवारी (दि. २९) दुपारी मामाला पाठवला. बाभळगाव येथील प्रमोद सगर याने आपले अपहरण केल्याचे त्याने कळवले. प्रमोद सगर हे पुण्यात व्यवसाय करतात. वास्तविक, त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. फेसबुकवरून त्यांचे नाव वापरण्याची शक्कल विक्रमने लढवली. आपल्याला बाभळगावहून औरंगाबाद व तेथून पुण्याला नेल्याचे त्याने म्हटले होते. रविवारी रात्री मात्र आपण पुण्यात सुखरूप असून सोमवारी लातूरला येत असल्याचे पोलीस व माध्यम प्रतिनिधींना कळवले. सोमवारी तो पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने आपण स्वत:च रचलेल्या बनावाची कबुली पोलिसांना दिली. प्रमोद सगर यांच्या तक्रारीवरून विक्रमविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.