कर्जमुक्ती व स्वस्त दरात बियाणे असे धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावर चर्चेत आहेत. मात्र, रोहयोच्या कामांमध्ये असणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याने राज्य किसान सभेच्या वतीने सुरू असणारे सत्याग्रह आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले. येत्या दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास गावोगावी उपोषण व त्यानंतर ३० मे रोजी ठाणे जिल्हय़ातील पालघर येथे तिरडी मोर्चा काढणार असल्याची माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशोक ढवळे यांनी दिली.
किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तालयात जाऊन जाब विचारला होता. त्यामुळे आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक बोलावण्यात आली. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत मिळावी, म्हणून राज्य किसान सभेतर्फे विभागीय आयुक्तालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आक्रोश सत्याग्रह सुरू होता. मंगळवारी दुपापर्यंत कार्यकत्यार्ंशी चर्चेस अधिकारी तयार नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते चिडले. त्यांनी आयुक्तालयात जाऊन जाब विचारला. त्यामुळे अधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांसमवेत बुधवारी बैठक झाली. रोजगार हमीतील त्रुटींवर यात चर्चा झाली. माहूर येथील रेणुकामाता मंदिराच्या मालकीचे शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांना निष्काशित करू नये, अशी मागणी करण्यात आली. या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरूच राहणार असून प्रशासनाकडून काम न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असे किसान सभेच्या वतीने ढवळे यांनी सांगितले. सत्याग्रहास पाठिंबा देण्यासाठी सिटू तर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली.