News Flash

‘काम देता का काम?’

शहरातही पाण्याअभावी बांधकामासह इतर छोटे-मोठे व्यवसाय बंद झाल्याने हाताला काम मिळणे कठीण झाले आहे.

दुष्काळामुळे शेतातील कामे कमी झाली. पाण्याच्या टंचाईमुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराचा रस्ता धरला, तरी शहरातही पाण्याअभावी बांधकामासह इतर छोटे-मोठे व्यवसाय बंद झाल्याने हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. रोजंदारीच्या प्रतीक्षेत उजाडल्यापासून कारंजा, राजुरीवेस, जुनी भाजी मंडई भागात थांबणाऱ्या मजुरांना आठ दिवसातून दोन किंवा तीन दिवस काम मिळत असल्याने कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न आहे. दररोज सकाळी हक्काने काम मिळणाऱ्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उभ्या असलेल्या मजुरांवर कोणी काम देते का काम, म्हणण्याची वेळ आली आहे.
शहराच्या कारंजा, राजुरीवेस, जुनी भाजी मंडई या भागातील मोक्याची ठिकाणे सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीच कामाच्या शोधातील शेकडो मजुरांच्या गर्दीने गजबजलेली असतात. बांधकाम व्यावसायिकांसह छोटे-मोठे गुत्तेदार, मजुरांचे ठेकेदारही दिवसाची मजुरी ठरवून काम देतात. हमखास काम मिळणारे ठिकाण झाल्याने मागील काही दिवसांपासून शहरालगतच्या वस्त्यांमधूनही मोठय़ा संख्येने मजूर या ठिकाणी येत असले, तरी सर्वाना काम मिळेल याची खात्री राहिली नाही. मात्र, सलग ३ वर्षांपासून अपुरा पाऊस व पाण्याची भीषण टंचाई यामुळे ग्रामीण भागातील लोकही कामाच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत.
पावसाअभावी शेतीतील कामे कमी झाली, तर शहरातही बांधकामासह इतर छोटे-मोठे व्यवसायही जवळपास बंद झाले आहेत. अशा स्थितीत मजुरांची संख्या वाढली आणि कामे कमी झाल्याने दिवसभर कामाच्या प्रतीक्षेत बसण्याची वेळ मजुरांवर आली आहे. बार्शी नाका भागातील मुकुंद नागरगोजे (वय ३२) यांनी सांगितले की, सकाळच्या वेळी शिदोरी बांधून राजुरीवेसला येताच काम मिळत होते, मोबदलाही चांगला मिळे. संध्याकाळी रोखीने मजुरी मिळत असे. सध्या मात्र दुपापर्यंत हाताला काम मिळत नसल्याने घर खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न सतावत आहे.
मोमीनपुरा भागातील इब्राहिम पठाण (वय २८) सेंट्रींगचे काम करतात. त्यांची पत्नी धुणी-भांडी करून घरखर्चाला हातभार लावते. ‘कमावते हात झाल्यापासून रोजगारावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. राजुरीवेस, जुनी भाजी मंडई येथे जाऊन थांबताच लोक कामाच्या ठिकाणी घेऊन जात. दिवसभराच्या कामाचा मोबदला दिल्यानंतर रात्री पुन्हा आणून सोडत. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. कित्येक तास वाट पाहिल्यानंतरही काम देण्यास कोणी येत नाही. परिणामी रिकाम्या हाताने घरी जावे लागते. आठवडय़ातून एक किंवा दोन दिवस काम मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेने झोपही येत नाही, अशी त्यांची कैफियत आहे. बाबुभाई (वय ३५) हे दररोज २० रुपये खर्च करून कामखेडय़ावरून शहरात कामासाठी येतात. परंतु ‘आमच्याकडे काम आहे’ असे कोणीही सांगत नाही. नवख्या माणसाकडे विचारणा करूनही काम मिळत नसल्याने आहे त्या पशात दिवस काढण्याची वेळ आली आहे. बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करणारे अमजद पठाण (वय २२) यांना साधारणत: ५०० रुपये रोज मिळत असे. आज कामेच बंद झाल्यामुळे बेकारीची वेळ आली आहे.
शहरात मजुरांची संख्या वाढत असली, तरी ग्रामीण भागाप्रमाणे कामाची हमी देणारी एकही योजना शहरासाठी नाही. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गत लोकांना काम उपलब्ध करून दिले जाते. मात्र, शहरात खासगी व्यावसायिकांकडेच काम मिळवावे लागते. पाणीटंचाईने शहरात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेले गृहप्रकल्प कमी झाल्यामुळे मजुरांना काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ हातावर पोट असणाऱ्या व रोज काम करून खाणाऱ्या वर्गाला जास्त बसू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 3:28 am

Web Title: labor shortages hardships
Next Stories
1 दुष्काळी मराठवाडय़ात मद्यनिर्मितीमुळे उत्पादन शुल्कात ४२० कोटींची वाढ
2 महावितरणचा हलगर्जीपणा चिमुकल्याच्या जिवावर बेतला
3 उद्धव ठाकरेंचे नेतृत्व ‘पिचके’!
Just Now!
X