27 September 2020

News Flash

हमालांची कमतरता, खतांचा साठा रेल्वे वाघिणींमध्येच

औरंगाबादेत जीवनावश्यक वस्तुपुरवठय़ात अडचण

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख

बंदच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहावा म्हणून सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात येत असले तरी माल उचलण्यासाठी हमालांची कमतरता जाणवत आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकात खतांची एक रेक म्हणजे ३२०० टन माल हमाल नसल्याने पडून आहे.

औरंगाबाद शहराच्या भोवताली आणि ट्रक टर्मिनसवर काही मालमोटारी उभ्या आहेत. सध्या ढाबे आणि उपाहारगृहे बंद असल्याने या वाहनचालकांची उपासमार होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. या समस्येवर उपाय म्हणून परराज्यात जाणाऱ्या वाहनचालकांबरोबर शिधा दिला जात आहे. पण शक्य असेल त्या वाहनचालकांना तयार फूडपॅकेट देण्यात येत आहेत. गावाभोवती उभ्या असलेल्या मालमोटारींमधील वाहनचालकांना जेवण पुरविण्यासाठी छोटी गाडी करून ही व्यवस्था केली जात असल्याचे औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी सांगितले.

वाहनांमध्ये माल चढवणेआणि उतरविण्यासाठी लागणारे हमाल उपलब्ध नाहीत. एकतर चौकाचौकांत पोलिसांची गस्त सुरू होण्यापूर्वी कामाला पोहोचले तरी घरी परतताना पोलीस अडवून मारण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे रेल्वे मालवाहतूक गाडय़ांमधील माल बाहेर काढता येत नाही. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सध्या खताने भरलेल्या रेल्वे वाघिणी उभ्या आहेत. जोपर्यंत पहिला माल उतरवला जाणार नाही, तोपर्यंत नव्याने ती मालगाडी पुढे पाठविता येणार नाही, असे औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक अशोक निकम यांनी सांगितले. हमाल किंवा मजुरांना रेल्वे स्टेशनपर्यंत पाठविण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावयाची असते. तशी परवानगी न मिळाल्याने २२ तारखेपासून वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाघिणी उभ्या आहेत.

मालमोटार आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्रे तयार करणे आणि त्यांचा गैरवापर तर होत नाही ना यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांची प्रवास दरम्यान उपासमार होऊ नये म्हणून प्रयत्न होत असले तरी ते अपुरे असल्याचे मत बहुतांश ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांच्याशी व्यापारी महासंघाची बैठक झाली. बैठकीत वाहतूक आणि पुरवठा यामध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे किमती वाढू शकतात काय, वाढल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायचे, याबाबतची चर्चा झाली.

ज्या राज्यातून साखर आणली जाते, तेथून होणारा वाहतुकीचा खर्च एकेरी भाडे पद्धतीमुळे वाढू शकतो. त्याचबरोबर हमाली मापाडींबरोबरही चर्चा करण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या अनुषंगाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पुरवठा विभागातील कर्मचारी आणि मोंढय़ातील हमाल यांच्याशी बैठक घेऊन सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

औरंगाबाद येथे करोना चाचणी

करोना चाचणी सोमवारपासून औरंगाबादमध्येच करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. करोना चाचणीचा एक रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर शहरातील बहुतांश नमुने बाधित नसल्याचे अहवाल येत आहेत. आता केवळ काही अहवाल येणे बाकी आहे.

भाजीपुरवठय़ासाठी पर्यायांचा विचार

भाजी बाजारातील गर्दी लक्षात घेता नव्याने काही जागाही पोलीस आयुक्तांना सुचविण्यात आल्या आहेत. चिकलठाणा येथील भाजी मंडई बाजारपट्टीमध्ये उभारावी, त्यामुळे भााजी विक्रेतेही दूर बसतील आणि भाजी आणणाऱ्यांची गर्दी होणार नाही. तसेच मुकुंदवाडी येथील भाजी मंडईही शाळेच्या मैदानावर भरविण्याच्या सूचना दिल्या तर गर्दी होणार नाही. दरम्यान, गर्दी रोखण्यासाठी चौकाचौकात पोलीस उभे असून प्रत्येक दुचाकी आणि चारचाकी चालविणाऱ्यास रोखले जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी शुकशुकाट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 12:42 am

Web Title: lack of attacks stocks of fertilizers are common among railway wagon abn 97
Next Stories
1 बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान
2 साखरेचा कोटा वाढवून देण्याचा निर्णय
3 Coronavirus : मराठवाडय़ात १ हजार २८ जणांचे विलगीकरण; १८ जणांचे अलगीकरण
Just Now!
X