12 December 2018

News Flash

प्रशासन ‘घोडय़ावर’!

खराब रस्ते व वाहनांची सोय नसल्याने पंचनाम्यासाठी युक्ती

खराब रस्ते व वाहनांची सोय नसल्याने पंचनाम्यासाठी युक्ती

मराठवाडय़ात ‘कापूसकोंडी’ झाली. नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना आणि बीड या सहा जिल्ह्य़ांमध्ये कापसावरच्या बोंडअळीने हैराण झाले. मदतही जाहीर झाली आणि पंचनाम्याची गडबड सुरू झाली. एरवी पंचनामे एका जागी बसूनच होते. या वेळी पंचनामे करताना जीपीएसवर अक्षांश आणि रेखांश देताना शेतकऱ्यांचा फोटोही तलाठय़ांना द्यावयाचा असल्याने मोठी फजिती झाली आणि प्रशासनाला चक्क घोडय़ावर बसावे लागले! वैजापूर तालुक्यातील अचलगावमध्ये तलाठय़ांनी घोडय़ावर बसून पंचनामे केले. कारण खराब रस्ते आणि वाहतुकीची सोय नसल्याने दुचाकीवर जावे लागत असे. अचलगावला शेतकऱ्यांनी तलाठय़ांना घोडे दिले आणि बोंडअळीची पाहणी घोडय़ावरून करण्यात आली. यानिमित्ताने एक बाब अधोरेखित झाली ती अशी की, रस्ते नसल्याने सारे काही अडले. महसूल प्रशासनाची ही अडचण सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लक्षात येईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठवाडय़ातील तीन जिल्ह्य़ांमध्ये १० लाख ४८ हजार ५३८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. बोंडअळीने सगळेच्या सगळे क्षेत्र बाधित झाले. ११ लाख ५५ हजार ११३ शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आणि तलाठय़ांच्या स्तरावर मोठा गोंधळ उडाला. एकेका तलाठय़ाला किमान चार गावांमध्ये पंचनामा करावा लागला. परिणामी या तीन जिल्ह्य़ांत आठ लाख ३९ हजार ७०१ शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी तलाठय़ांना गावे वाटून देण्यात आली. सरासरी तीन ते पाच गावांचे पंचनामे एका तलाठय़ाने करावे, असे कार्यबल वाढले.

पूर्वी तलाठी सज्जावरच पंचनामे झाल्याच्या नोंदी करण्याची पद्धत सर्रासपणे अंमलबजावणीत आणली जायची. आता त्यासाठीचे अ‍ॅप विकसित करण्यात आले आणि अक्षांश-रेखांशसह माहिती भरायची असल्याने तलाठय़ाला त्या शेतात जाणे अपरिहार्य झाले. खेडोपाडी शेतकरी तलाठय़ाला गाठायचे. अगदी सकाळी ८ वाजता म्हटले तरी तलाठय़ाच्या घरी जाऊन त्याची ‘सेवा’ करून काम पदरात पाडून घेतले जात असे.

पहिल्यांदाच पंचनाम्यासाठी तलाठी बाहेर पडले आणि लक्षात असे आले की, अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधनेच नाही. रस्ते खराब आहेत. एका शेतातून दुसऱ्या शेतात जायचे असेल तर दुचाकीही वापरता येत नाही. मग अचलगावच्या शेतकऱ्यांनी तलाठी आणि पंचनामा करणाऱ्या सर्व सदस्यांना एकेक घोडा दिला आणि प्रशासन पंचनाम्यासाठी घोडय़ावर स्वार झाले! घोडय़ावर स्वार होण्याची ही वेळ पायाभूत सुविधांमध्ये वाढ न झाल्यामुळे असल्याचे सांगण्यात येते.

काही ठिकाणी तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे. खराब रस्ते आणि महसूल प्रशासन ही दोन्ही खाती एकाच व्यक्तीकडे आहे. पंचनाम्याच्या निमित्ताने एका खात्याने दुसऱ्या खात्यातील समस्या समोर आणल्या आणि महसूल प्रशासनाला थेट इतिहासातील घोडय़ाची वाहतूक यंत्रणा पंचनाम्यासाठी वापरावी लागली.

First Published on December 28, 2017 12:49 am

Web Title: lack of transport facilities in maharashtra