नदीकाठच्या ग्रामस्थांची ३० वर्षांपासून फरपट

हिमायतनगर तालुक्यातील दिघीसह इतर काही पैनगंगा नदीकाठावर वसलेल्या गावातील विद्यार्थ्यांना पैलतीरच्या गावात असलेल्या शाळेत जाण्यासाठी रुखातून (नौका) जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची पैनगंगा पार करण्यासाठी पूल-सेतू नसल्यामुळे ३० वर्षांपासून फरपट सुरू आहे. मात्र आजपर्यंत ना प्रशासनाने त्यांच्या अडचणीकडे गांभीर्याने पाहिले, ना कोणी लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिले.

दिघीसह आजूबाजूची विरसनी, वाघी, टेंभुर्णी, घारापूर, खडकी बा., जवळगाव, आदींसह अन्य काही गावे ही पैनगंगेच्या परिसरात वसलेली आहेत. या गावातील शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना विदर्भातील गावात येण्या-जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. परंतु नदीवर पूल नसल्याने शिक्षणासह दळण-वळणासाठी ये-जा करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. संपूर्ण पावसाळा आणि नदीचे पाणी ओसरेपर्यंत पाण्यातून किंवा रुखावरून जीवघेणा प्रवास करत पलतीर गाठावा लागतो. तसेच या भागातील गोर-गरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी पाठविण्याची कुवत नसल्यामुळे अंतराने दीड ते दोन किलोमीटर नजीक असलेल्या विदर्भातील उमरखेड तालुक्यातील चातारी येथील शाळांमध्ये १२ वी पर्यंतचे शिक्षण घेता येते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी-विद्याíथनी या ठिकाणी शिक्षणासाठी पायी ये-जा करतात. उन्हाळ्यात कच्चा रस्ता आणि पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तर सर्वसामान्यांना आíथक भार सोसावा लागतो. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळा गाठणे नित्याचेच झाले आहे.

दिघीसह इतर गावच्या लोकांनी या ठिकाणी पनगंगा नदीवर पूल-कम-बंधारा उभारण्यात यावा, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासून लावून धरली आहे.

यासाठी अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले; परंतु आतापर्यंत कोणीच या रस्त्याचा किंवा पुलाचा प्रश्न मार्गी लावला नाही, अशी खंत गावकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींपुढेही ही अडचण निवेदनातून मांडली आहे.

दिघीजवळ नदीवर बंधारा-पूल उभारल्यास याचा फायदा आजूबाजूच्या गावाला होणार आहे. या ठिकाणी बंधारा उभारून गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांची होणारी गरसोय थांबवावी, अशा मागणीचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये सूचक संतोष गायकवाड यांनी मांडला. त्याला मानकु कदम यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने मंजूर केला असून त्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, हिमायतनगरचे तहसीलदार, गटविकास, गटशिक्षण अधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींनाही देण्यात आले आहे. निवेदनावर संदीप आगीरकर, सुनील वानखेडे, माधव तरटे यांच्यासह अनेकांच्या सह्य़ा आहेत.