23 February 2019

News Flash

औरंगाबादच्या कचराकोंडीवरील उपाययोजना अजूनही निविदेतच

बुधवारच्या सर्वसाधारण सभेत पहिल्या सत्रात शहरातील कचरा प्रश्नी चर्चा झाली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एक हजार चारशेहून अधिक सफाई कामगार, ६५ कोटींवरचा कचऱ्यावरचा खर्च तरीही शहरात कचऱ्याची समस्या असल्यामुळे येत्या काळात बंदिस्त वाहनात कचरा वाहतूक व्हावी म्हणून ३०० ऑटोरिक्षांची खरेदी केली जाईल आणि खासगी एजन्सी नेमून कचरा गोळा करणे आणि वाहतूक केली जाईल. त्या पद्धतीच्या निविदा तयार करण्यात आल्याचा खुलासा महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केला. मात्र, कोणत्या दिवसापासून कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल, या नगरसेवकांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. नगरसेवकांनी शहरातील कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा दोन तासांच्या चर्चेत पाढा वाचला. वैतागलेल्या भाजपच्या सदस्या विमल केंद्रे यांनी कचरा प्रश्नी काहीच काम होत नसल्याबद्दल राजीनामा देऊ, असे महापौरांना सुनावले. कचऱ्याच्या संदर्भात पूर्वी नेमलेल्या रॅमकी एजन्सीचा अनुभव लक्षात घेऊन नियोजन केले जावे, अशी सूचना करण्यात आली.

बुधवारच्या सर्वसाधारण सभेत पहिल्या सत्रात शहरातील कचरा प्रश्नी चर्चा झाली. नगरसेवक रामेश्वर भादवे म्हणाले, नऊ वेळा निविदा काढण्यात आल्या. आता ज्या भागात प्रक्रिया करण्यासाठी म्हणून खड्डे खोदले होते आणि त्यात कचरा भरला होता. ते खड्डे पुरेपूर भरले आहेत. बहुतांश ठिकाणी दरुगधी सुटली आहे. अशा स्थितीत काढलेल्या निविदेमध्ये नव्याने ५०० रिक्षा घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने का ठेवला, या प्रश्नाला उत्तर देताना कचरा व्यवस्थापन प्रमुख बोंबे म्हणाले, निविदापूर्व बैठकीमध्ये ठेकेदारांशी चर्चा केल्यानंतर ३०० रिक्षा घेण्याचे ठरविले आहे. प्रशासकीय अधिकारी निविदांच्या अनुषंगाने खुलासे करत होते आणि नगरसेवक विचारत होते, की एवढे काम करता तर त्याचा परिणाम का दिसून येत नाही? डीपीआर तयार करताना अंदाधुंदी चालली होती का? कोणती यंत्रसामग्री घेणार? ती कोठे बसवणार, याचे तपशील नगरसेवकांना दिले जात नाहीत असे प्रश्न उपस्थित करण्यात आले

प्रमोद राठोड, राजेंद्र जंजाळ यांनी कचरा प्रश्नी चर्चेत महत्त्वाचे मुद्दे मांडले. जंजाळ म्हणाले, पूर्वी ज्या रॅमकी एजन्सीला कचरा उचलण्याचे काम दिले होते, त्यांना प्रतिटन पैसे दिले जात, मात्र प्रतिटन पैसे मिळतात म्हणून त्यांनी कचऱ्यात दगड टाकले आणि वजन करून घेतले. महापालिकेचे नुकसान झाले. असे नुकसान नवीन एजन्सी नेमताना होऊ नये. पूर्वीच्या एजन्सीचा अभ्यास करून नव्याने काम करण्याची गरज आहे. काही नगरसेवकांनी बेरात्री महापालिकेकडून कचरा साठवला जातो, अशी तक्रार केली. नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी जोपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत कचऱ्याचा प्रश्न सुटणार नाही, असे सांगितले. हा सूर नगरसेवक राजू शिंदे यांनीही लावून धरला. दोन तासांच्या चर्चेनंतर आयुक्तांनी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सभागृहासमोर मांडला. दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल, अशी तीन प्रक्रिया केंद्र उभारली जाणार असून पडेगाव, चिकलठाणा आणि हर्सूल येथे होणाऱ्या या प्रक्रिया केंद्रासाठी २५ जुलै रोजी निविदा उघडण्यात येणार असून हर्सूलची निविदा ५ ऑगस्ट रोजी उघडली जाणार आहे.

नगरसेवकांनीच पुढाकार घ्यावा

मात्र, शहरात विविध वॉर्डात कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरसेवकांनीच पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. कचराप्रश्नी काम करताना प्रोत्साहन मिळावे म्हणून वॉर्डामध्ये स्पर्धा घेतल्या जाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. दोन तासांच्या चर्चेनंतरही कचरा प्रश्न केव्हा संपू शकेल, याचा अंदाज सभागृहातील नगरसेवकांना आला नाही. बहुतेक नगरसेवकांनी वॉर्डात पडलेला कचरा आणि निर्माण झालेली दरुगधी या प्रश्नाचा ऊहापोह केला.

First Published on July 12, 2018 1:14 am

Web Title: lack of waste management