दगडफेक, भजनाने निषेध सुरूच; विरोध झाल्यास पोलीस बळ वापरणार

गेल्या १५ दिवसांपासून शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. महापालिकांच्या हद्दीतील स्वमालकीच्या जागेत कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला असून शुक्रवारी चार वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, तर शनिवारीही गाडय़ांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर आणि पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. नारेगाव वगळून अन्यत्र महापालिकेच्या जागांवर कचरा टाकण्यास विरोध झाला तर पोलीस बळाचा वापर करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, आज कांचनवाडी येथे नागरिकांनी भजन करून महापालिकेला जाग आणण्यासाठी आंदोलन केले. काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी शासनाचा निषेध केला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठकांवर बैठका सुरू आहेत. भोवतालच्या गावांमधील नागरिकांशी संवाद केला जात आहे, असे डॉ. भापकर यांनी शनिवारी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहराजवळील नारेगाव परिसरात गेल्या ३० वर्षांपासून कचरा टाकला जात होता. कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यामुळे साठलेल्या कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे. तो अंदाजित २० लाख मेट्रिक टन एवढा असावा, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यावर बायोमायनिंगचा प्रयोग केला जावा. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असे शासनाने कळविले आहे. १५ दिवसांपूर्वीच ४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव त्यासाठी तयार करण्यात आला असून या प्रस्तावाची उच्चाधिकार समितीमार्फत छाननी झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. त्यानंतर यासाठी निधी मिळेल, असे महापालिका डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. महापालिकेकडून ३०६ वाहनांद्वारे कचरा टाकला जातो. गेल्या १५ दिवसांपासून तो कचरा डेपोपर्यंत जात नाही. परिणामी १३८ वाहनांमध्ये ४२१ टन कचरा भरलेला आहे. दोन हजार टन कचरा रस्त्यावर पडलेला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी शहरातून गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी कांचनवाडी परिसरात गेलेल्या वाहनांना नागरिकांनी अडवले. कांचनवाडी या वॉर्डातून शहराचे महापौर नंदकुमार घोडेले विजयी झालेले आहेत, हे विशेष.

शुक्रवारी कचरा टाकणाऱ्या गाडय़ांना विरोध करणाऱ्या २०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या परिसराच्या नगरसेविका विमल कांबळे यांचे पती ज. ना. कांबळे यांच्यावरही प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी पुन्हा चार गाडय़ांवर दगडफेक करण्यात आली. अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रशासनाला शहाणपण यावे, यासाठी नागरिकांनी आज भजन करून प्रशासनाचा निषेध केला. नारेगाव येथे पुन्हा कचरा टाकता यावा, यासाठी प्रशासकीय पातळीवरील बोलणी सुरू आहे. काही दिवसांचा वेळ येथील नागरिकांनी दिला तर त्यांना विकासाच्या खास तरतुदी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी बोलणी नागरिकांशी सुरू असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या स्वमालकीच्या जागेत कचरा टाकण्यास काही नागरिकांनी विरोध केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. आवश्यकता भासल्यास पोलीस बळही वापरले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. जे नगरसेवक अशा आंदोलनांना पाठिंबा देतील, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यापर्यंतची कारवाईदेखील प्रशासनाच्यावतीने केली जाऊ शकते, असे महापालिका आयुक्त मुगळीकर म्हणाले. कचरा जमिनीत पुरून त्यातून निर्माण होणारा वायू बाहेर काढण्यासाठीची प्रक्रियाही हाती घेतली जाऊ शकते. मात्र, कचरा कमी व्हावा, यासाठीचे प्रयोग करण्यासाठी आवश्यक तो वेळ प्रशासनाला हवा आहे, तो भोवतालच्या गावातील नागरिकांकडून मिळत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. ३०-३५ वर्षांपासून नारेगावच्या कचरा डेपोत प्रशासनाने केलेले प्रक्रियेबाबतचे सर्व प्रयोग अपयशी ठरले. परिणामी कोणत्याही भोवतालच्या गावात कचरा टाकू दिला जात नाही. कांचनवाडी, तीसगाव, गोलवाडी यांसह शहराच्या दहा दिशांना कचरा टाकण्याची जागा शोधली जात आहे. मात्र, सर्वत्र विरोध होत असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, ज्या ज्या जागेत कचरा टाकता येऊ शकते, त्या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

कचऱ्याभोवती बंदोबस्त

शहरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी विविध भागात पोलीस तैनात केले आहेत. सातारा पोलीस ठाणे परिसरात क्षेत्र-२चे पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, चार पोलीस निरीक्षक, १२५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात महापालिकेच्या काही कचरागाडय़ांवर नागरिकांनी दगडफेक केली. त्यात वाहनांच्या काचा फुटल्या. शुक्रवारी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक ताब्यात घेतले आहे.