दहावीच्या परीक्षेत लातूरची गुणवत्ता चांगलीच घसरली असून, एकेकाळी राज्यात सर्वाधिक गुण घेणाऱ्या लातूरचा या वर्षी निकालात राज्यात शेवटचा क्रमांक आला आहे.

राज्यातील नऊ मंडळांपकी लातूरचा क्रमांक शेवटचा आहे. राज्याच्या उत्तीर्णतेचे सर्वसाधारण प्रमाण ८९.५६ टक्के असताना लातूरचा दर्जा चांगलाच घसरला असून, हा निकाल केवळ ८१.५४ टक्के लागला आहे. लातूर विभागात लातूर जिल्हय़ाचा क्रमांक पहिला असून, शेवटचा क्रमांक नांदेड जिल्हय़ाचा आहे. केवळ ७४.४८ टक्के इतकीच निकालाची प्रत राखून राज्यात सर्वात कमी निकाल लागलेला जिल्हा म्हणून नांदेडची नोंद झाली आहे.

लातूर विभागातून १ लाख ६ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदवले. त्यापकी १ लाख ५ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पकी ८६ हजार ४१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.४५ टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.१७ टक्के इतके आहे.

लातूर जिल्हय़ाचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.५३, उस्मानाबादचे ८५.६२ तर नांदेडचे ७४.४८ इतके आहे. नांदेडमधील मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण केवळ ७२.०२, तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७७.४७ इतके आहे. विभागात सर्वसाधारणपणे मुलांपेक्षा मुलींची गुणवत्ता ५ टक्क्याने अधिक आहे.

मंडळाचा प्रभारी कारभार

लातूर परीक्षा मंडळात गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष व सचिव पूर्णवेळ नाहीत. प्रभारी व्यक्तीवर या मंडळाचा कारभार सुरू असल्यामुळे एकूण मंडळावर फारसा कोणाचा अंकुश राहिलेला नाही. या वर्षी लातूर विभागात ३३ भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती व त्यांनी १२८७ केंद्रांना भेटी दिल्या होत्या. राज्य मंडळाने जी माहिती प्रकाशित केली आहे त्यात लातूरच्या भरारी पथकाने एकाही केंद्राला भेट न दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वास्तविक ३ मे रोजीच राज्य मंडळाकडे ही माहिती पुरवली असतानाही राज्य मंडळाने चूक केली आहे. पूर्णवेळ अधिकारी उपस्थित नसल्यामुळे राज्य मंडळाशी सतत संपर्क नसणे यातूनही असे प्रकार घडत असावेत.