09 March 2021

News Flash

लातूर महापालिकेस ५० कोटींचे उत्पन्न अपेक्षित

येथील महापालिकेच्या तिजोरीत चौपटीहून अधिक उत्पन्नाची भर पडणार आहे.

येथील महापालिकेच्या तिजोरीत चौपटीहून अधिक उत्पन्नाची भर पडणार आहे. विशेष म्हणजे एक रुपयाही कर न वाढविता हे होणार आहे. महापालिकेच्या हद्दीत मालमत्ताधारकांची वाढती संख्या, प्रथमच मालमत्ताकर भरणाऱ्यांची मोठी संख्या, जुन्या बांधकामात सुधारणा करून झालेली वाढीव बांधकामे याचा अंदाज घेता गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच महापालिकेच्या उत्पन्नाचा आकडा चारपट वाढून ५० कोटींपेक्षाही अधिक उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.

महापालिकेच्या कर विभागात ७० हजार मालमत्ताधारकांची नोंद असली, तरी वाढते नागरीकरण, नवीन बांधकामे, जुन्या बांधकामात सुधारणा करून झालेली सुधारित व वाढीव बांधकामे याचा अंदाज घेता एकूण मालमत्ताधारकांची संख्या एक लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे. या नोंदीतून ३० हजार मालमत्ताधारकांकडून प्रथमच करआकारणी होईल. मालमत्ताधारकांकडून कर आकारणीतून मनपाला वर्षांला १२ ते १३ कोटी उत्पन्न मिळते. आता हा उत्पन्नाचा आकडा चारपट वाढून ५० कोटी रुपये पालिकेला मिळणार आहेत. अद्ययावत यंत्रणेचा वापर करीत सर्वेक्षणाचे काम राज्यात प्रथमच होत असल्याचे महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

गेल्या २० वर्षांत लातूर शहरात मालमत्तांचे मूल्यमापन झाले नाही. दर पाच वर्षांनी महापालिका हद्दीत येणाऱ्या मिळकतीचे पुन्हा सर्वेक्षण करून करमूल्यांकन करणे आवश्यक आहे. लातूर महापालिकेने गेल्या ऑक्टोबरपासून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. अमरावतीच्या स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. यांना हे काम दिले. आतापर्यंत ६० हजार मालमत्तांच्या सर्वेक्षणातून १५ हजार मालमत्ताधारकांना अजून करआकारणीच झाली नसल्याचे समोर आले. या मालमत्ताधारकांकडून करआकारणी सुरू झाल्यास सुमारे १० कोटी रुपये उत्पन्न पालिकेला मिळणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत ७० हजार मालमत्ताधारक असल्याची कर विभागात नोंदणी आहे. महापालिकेच्या वतीने केलेले नवे सर्वेक्षण जीआयएस आधारित आहे. प्रत्येक घराची सॅटेलाईट इमेज घेतली जाते. त्यानुसार घराचा बांधकाम नकाशा नव्याने तयार केला जातो. अस्तित्वात असलेल्या घराचा फोटो काढला जातो. झालेल्या बांधकामाची प्रत्येक खोल्यांची मोजमापे घेतली जातात. घरावर स्लॅब आहे की पत्रे, िवधनविहीर आहे का, पुनर्भरण केले आहे का, झाड लावले आहे का, नळ आहे का, अशी माहिती घेतली जाते. प्रत्येक घराला युनिक कोड दिला जातो. मालमत्ताधारकाचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक घेतला जातो. मालमत्ताधारकास महापालिकेत न जाता ऑनलाईन करभरणा करता येतो. संपूर्ण सर्वेक्षणानंतर मालमत्ताधारकांची सही घेतली जाते. सर्वेक्षणामधील ५० हजारपकी १३ हजार ८८७ जणांच्या घरात िवधनविहीर आहे. पकी १ हजार ६७५जणांनी पुनर्भरण केले. एकूण ७ हजार मालमत्ताधारकांनी आपल्या घराच्या आवारात १९ हजार ५५० लावलेली झाडे अस्तित्वात आहेत, तर उर्वरित ४३ हजार मालमत्ताधारकांच्या घरात एकही झाड नाही.

या सर्वेक्षणामुळे शहराचा आरसाच समोर येणार आहे. संपूर्ण सर्वेक्षण होण्यास आणखी सात-आठ महिन्यांचा कालावधी लागेल. ज्या १५ हजार मालमत्ताधारकांची कर आकारणी झाली नाही, त्यांना कर भरण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. महापालिकेला संबंधित मालमत्ताधारकांची गेल्या ६ वर्षांपासून करआकारणी लावण्याचे अधिकार आहेत. यातून महापालिकेस आतापर्यंत झालेले नुकसान भरून येण्यास मदत होणार आहे. अद्ययावत यंत्रणेचा वापर करून मालमत्ताधारकांचे सव्‍‌र्हेक्षण करण्याचा हा पहिला प्रयोग लातुरात सुरू असून इतर महापालिकांसाठी तो दिशादर्शक ठरणारा आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर टाकली असून कर्मचारी प्रशिक्षित होईपर्यंत अथवा अडचण आल्यास संबंधित संस्थेने या बाबत सहकार्य करण्याची अट करारात टाकली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2016 2:22 am

Web Title: latur municipal corporation expected 50 crore income
Next Stories
1 माजी संचालकाला अटकेपूर्वी ७२ तास नोटीस देण्याचे आदेश
2 ‘एमआयएम’चे परभणीत धरणे आंदोलन
3 नासेरच्या अटकेने ख्वाजा युनूसच्या आठवणी ताज्या
Just Now!
X