कर्जापोटी नवरा गेला अन् सरणासाठी पुन्हा कर्ज..

कर्जाच्या विवंचनेपोटी आत्महत्या केलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कुटुंबाला कर्ज काढावे लागल्याने त्याच्या कुटुंबीयांवर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यांच्यावर झालेल्या कर्जाच्या विळख्याचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रकाशित होताच अनेकांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील शेतकऱ्याची व्यथा कळविली, पण या दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, लातूरच्या एका दानशुराने २५ हजारांचा धनादेश शेतकऱ्याची विधवा सिरकोबाई मेहरुराम पोरेटी हिच्या खात्यात जमा करून या कुटुंबाला पूर्णत: कर्जमुक्त केले आहे.

या जिल्ह्य़ातील जामनेरा येथील मेहरुराम सुंदरसिंह पोरेटी या ५० वर्षीय अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेकडून १४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. नापिकीमुळे त्याची परतफेड करता न आल्याने २४ मे रोजी रात्री त्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तो गेला, परंतु कर्ज त्याच्या कुटुंबीयांचा पिच्छा सोडत नव्हते. मेहरूरामचा मृत्यू २४ मे च्या रात्री झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आत्महत्येची बातमी कळल्यावर संध्याकाळी त्याचा मृतदेह कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, परंतु तेथे गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टरच नसल्याने शवविच्छेदन न झाल्याने मेहरुरामचे पार्थिव कुरखेडय़ाच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले.

२६ मे रोजी सकाळी मेहरुरामच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह कुरखेडय़ाला नेण्यासाठी एका वाहन मालकास विचारल्यावर त्याने भाडे ३ हजार रुपये सांगितल्यावर या कुटुंबीयांचे अवसान गळाले. खिशात फुटकी कवडीही नव्हती. काय करावे काहीच सुचत नव्हते. मात्र, शवविच्छेदन करणे गरजेचे होते. मग विषय पुन्हा जमिनीवरच आला. ज्यामुळे मेहरुरामचा जीव गेला तीच जमीन त्याच्याच अंत्यसंस्कारासाठी सिरकोबाईला एका इसमाकडे गहाण ठेवून ५ हजारांचे कर्ज घ्यावे लागले. त्यातून मेहरुरामचे शवच्छिेदन आणि अंत्यसंस्कार झाले.

नक्षलग्रस्त भागातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची ही कथा ३१ मे रोजी ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यावर देशभरातील पत्रकार आणि संवेदनशील व्यक्तींनी या महिलेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. दिल्लीतील पत्रकार अशोक वानखेडे यांनी तर पंतप्रधानांना पत्र लिहून देशातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती कथन केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अनेकांनी पत्र लिहून दुष्काळामुळे शेतकरी कसा होरपळत असून त्यांना मदतीची गरज असल्याचे कळविले व गडचिरोली जिल्हा प्रशासनालाही अनेकांनी याबाबत माहिती दिली. मात्र, कुणालाच पाझर फुटला नाही. दरम्यान, या वृत्ताची दखल लातूरचे विक्रम संग्राम मकनीकर या दानशुराने घेतली. त्यांची ही बातमी वाचताच ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सदर महिलेस बॅंक ऑफ इंडियात स्वत:चे बचत खाते उघडण्यास सांगितले.

कोरचीचे नंदू वैरागडे या पत्रकाराने त्यासाठी तिला मदत केली. बॅंक खाते उघडल्यावर विक्रम मकनीकर यांनी ८ जूनला सिरकुबाईच्या खात्यात २५ हजार रुपये जमा केले. या मदतीतून सिरकुबाईने बॅंकेचे व खासगी सावकाराचे कर्ज फेडले. आता हे शेतकरी कुटुंब पूर्णत: कर्जमुक्त झाले आहे. जेथे राजकीय व्यवस्था आणि प्रशासकीय अधिकारी पोहोचू शकले नाही तेथे विक्रम मकनीकर या व्यक्तीने लातूरमधून या शेतकरी कुटुंबाला कर्जमुक्त केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.