लातूर शहरातील गुणवत्तेच्या बाबतीत नावाजलेल्या शाळांची दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता कायम असल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.

गुणवत्तेच्या बाबतीत गाजलेल्या केशवराज विद्यालयाने आपल्या निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली. शाळेचा निकाल ९८.७० टक्के लागला. १०० टक्के गुण घेणारे ७ विद्यार्थी, ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेणारे १७७ विद्यार्थी आहेत. ६१९ पकी ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षभरात १० परीक्षा, ५ पालक मेळावे, घरी जाऊन पालकांशी संपर्क, कमकुवत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, विज्ञान व गणित या विषयांचे जादा तास घेतले, रात्रीची अभ्यासिका चालवली, सर्वाच्या एकत्रित प्रयत्नामुळे याही वर्षी गुणवत्ता कायम राहिली असल्याचे संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष शिवदास मिटकरी, मुख्याध्यापक उमेश सेलूकर आदींनी अभिनंदन केले.

मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली. संस्थेच्या एकूण ११९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेतले. संस्थेचा निकाल ९७.२२ टक्के आहे. संस्थेअंतर्गत श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या प्रशाला, श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल व राजा नारायणलाल लाहोटी सीबीएसई स्कूलमधून बसलेले एकूण ६०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बंकटलाल लाहोटी व राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. मारवाडी राजस्थान विद्यालयाचा निशांत नरवटे (९८.२० टक्के) गुण घेऊन विद्यालयात प्रथम आला. गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयातून हाके सोनिया हिने ९८ टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक पटकावला. बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमधील रमण तोष्णीवाल याने ९८.८०, तर राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमधील तेजस राजपूत याने ९९.४० टक्के गुण घेऊन विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर इन्नानी व सचिव श्यामसुंदर भार्गव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

श्री देशीकेंद्र विद्यालयाचा निकाल ९४.६६ टक्के लागला. ७८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, पकी ७४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शंभर टक्के गुण घेणारे या विद्यालयात पाच विद्यार्थी असून ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल १९९ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षेतील आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या देशीकेंद्र विद्यालयाने या वर्षीही आपला दबदबा कायम ठेवला. मुख्याध्यापक प्रवीण करपे व पर्यवेक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जयक्रांती माध्यमिक विद्यालयातील पवन बाबर याने ९६.२० टक्के गुण घेऊन विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला. ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेतलेले ३५ विद्यार्थी असून प्रथम श्रेणीतील ३० विद्यार्थी आहेत. संस्थेचे सचिव प्रा. गोिवद घार व मुख्याध्यापक दिलीप टेकाळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राजमाता जिजामाता विद्यालयाचा दहावीचा निकाल ९१ टक्के लागला. नागेश दाडगे हा विद्यार्थी ९४.४० टक्के गुण घेऊन विद्यालयात पहिला आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डी. एन. केंद्रे यांच्यासह मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांनी अभिनंदन केले.

श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा ९६.४२ टक्के निकाल लागला. विद्यालयातील २२ विद्यार्थी विशेष गुणवत्ताधारक ठरले. तुषार भोसले ९८.१० टक्के गुण घेऊन विद्यालयात पहिला आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जीवन विकास प्रतिष्ठानद्वारा संचालित मूकबधिर विद्यालयातील ३२ पकी १४ विद्यार्थी विशेष श्रेणीत, १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, सचिव रामानुज रांदड, कोषाध्यक्ष बाबुराव सोमवंशी आदींसह मुख्याध्यापक डी. डी. खांडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.