01 October 2020

News Flash

‘नारायणा’विना महालक्ष्मीपूजन

आर्थिक विवंचनेतून पतीने साथ सोडली. आता संसाराचा गाडा एकटीलाच ओढावा लागतो आहे.

आर्थिक विवंचनेतून पतीने साथ सोडली. आता संसाराचा गाडा एकटीलाच ओढावा लागतो आहे. घरातली लक्ष्मी नाराज झाली. तिच्या चणचणीमुळेच कुटुंबाचे छत्र हरपले. तरीही तिच्यावर किती दिवस नाराज राहायचे? रीतीरिवाज म्हणून झेपेल तसा सण साजरा करायचा. ऐपत पाहूनच महालक्ष्मीची पूजा करणार आहे.. मीनाबाई गुणवंत भोसले सांगतात.
कर्जाचा वाढता डोंगर, कमी न होणारा खर्च, दुष्काळामुळे उद्याचं भवितव्य अंधारलेले दिसत असताना निलंगा तालुक्यातील दगडवाडी येथील गुणवंत भोसले (वय ३८) या शेतकऱ्याने नऊ महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. पत्नी मीनाबाई, सातवीत शिकणारा विक्रम व सहावीत शिकणारी वैष्णवी या दोन मुलांचा त्यांच्यामागे जीवनसंघर्ष सुरू आहे. वडिलोपार्जित दोन एकर जमीन. मिळेल तेथे रोजगार करून घर भागवावे लागते. महालक्ष्मीचा सण महत्त्वाचा. घरात येणाऱ्या लक्ष्मीचा सन्मान करण्याचा हा सण. पण घरातील लक्ष्मी नाराज झाली. तिच्या चणचणीमुळेच कुटुंबाचे छत्र हरपले. मात्र, ती कोपली म्हणून तिच्यावर रागराग करून कसं चालणार? परंपरा म्हणून झेपेल तसा सण साजरा करायचा, असे मीनाबाई म्हणाल्या.
निलंगा तालुक्यातीलच चिंचोली सयाखान येथील बिराजदार कुटुंबाची हीच स्थिती. महादेव भीमराव बिराजदार (वय ५२) यांनी गतवर्षी कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केली. पत्नी महादेवी, अविवाहित मुलगा भीमाशंकर व दोन विवाहित मुली. अडीच एकर जमीन. गावात चहाचे हॉटेल. भीमाशंकर बारावीपर्यंत शिकलेला. वडिलांच्या निधनानंतर हॉटेल बंद पडले. हाताला काम नाही. एक बहीण बाळंतपणासाठी घरी आली. शेतात पीक नाही, हाताला काम नाही या स्थितीत महालक्ष्मीचा सण साजरा करायचा कसा? हा प्रश्न. मात्र, तरीही लक्ष्मीचा अवमान नको, या साठी उसनवारी करून सण साजरा करण्याची तयारी केली जात असल्याचे भीमाशंकर म्हणाला. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे नव्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नारायणाविना महालक्ष्मीची पूजा कराव्या लागणाऱ्या कुटुंबीयांच्या दुखाला पारावार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2015 1:20 am

Web Title: laxmi worship without narayan
Next Stories
1 जालन्यात ३० तास पर्जन्यवृष्टी; शेते जलमय, वाहतूक खोळंबली
2 ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम लढय़ाला बाबासाहेबांचे वैचारिक पाठबळ’
3 मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्याचे स्वागत
Just Now!
X