19 January 2018

News Flash

पालेभाज्यांचे भाव कडाडले

हिरवी मिरची १२०, फुलकोबी १५० रुपये

वार्ताहर, हिंगोली | Updated: June 10, 2016 3:45 AM

हिरवी मिरची १२०, फुलकोबी १५० रुपये
पाण्याअभावी पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने मिरची थेट हैदराबादहून, तर इतर पाल्याभाज्याही बाहेरील जिल्ह्यांतून बाजारात आणाव्या लागत आहेत. हिरवी मिरची १२० रुपये, तर फुलकोबी १५० रुपये किलो भावाने सध्या विकली जात आहे. इतरही पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने महागाईची झळ सर्वसामान्य कुटुंबाला बसत आहे.
जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था नसल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील उपलब्ध पाण्यावरच पाल्याभाज्यांचे पीक घ्यावे लागते. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप व रब्बी पीक गेले.
परिणामी, पालेभाज्यांसारखे पीक घेणे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नच ठरण्याची वेळ आली आहे. शहर परिसरातील सावा, समगा, अंधारवाडी, कारवाडी, बासंबा, पिपळखुटा, संवड अशा काही ठराविकगावांमधील शेतकरी पालेभाज्यांचे पीक घेतात. मात्र, पाण्याअभावी पाल्याभाज्यांचे पीक घटल्याने बाहेर जिल्ह्यांतून पालेभाज्या बाजारात विक्रीसाठी आणाव्या लागत आहेत.
पालक, मेथी, कोथिंबिरीची जुडी प्रत्येकी १५ ते २० रुपयांना विकली जात आहे. फळभाज्यांचे किरकोळ बाजारातील भाव किलोमध्ये- हिरवी मिरची १२० रुपये, फुलकोबी १५० रुपये, टोमॅटो ४० ते ५०, वांगी ५० ते ६०, पत्ताकोबी ७० ते ८०, खिरे ४० ते ५०, तुरई ६० ते ८०, शिमला मिरची ५० ते ६०, चवळी ७० ते ८०, कारले १२० रुपये, शेवगा शेंग ५० ते ६० रुपये या दराने विक्री सुरू आहे.
पाल्याभाज्यांचे भाव वाढल्याने महागाईचा तडाखा सामान्य कुटुंबाला सहन करावा लागत आहे. मृग नक्षत्राचा पाऊस झाला तर किमान एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना पालेभाज्याचे पीक घेता येईल.

First Published on June 10, 2016 3:45 am

Web Title: leafy vegetables price rise up
टॅग Leafy Vegetables
  1. No Comments.