आमदार सतीश चव्हाण यांचे स्पष्टीकरण ; विधान परिषद निवडणूक

विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपा पुरस्कृत संभाव्य अपक्ष उमेदवारास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, असे या पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यासंदर्भात उभय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची एक बठक झाली असून पुढील बठक दसऱ्यानंतर मुंबईत होणार आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराला ‘राष्ट्रवादी’ने पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव असून त्यात काही विघ्न येईल असे आपल्याला वाटत नसल्याचे सांगून आमदार चव्हाण म्हणाले, की नांदेडमध्ये होणाऱ्या निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र उमेदवार उभा करणार का, अन्य कोणाला पाठिंबा देणार ते मला ठाऊक नाही; पण ‘त्या’ उमेदवाराला ‘राष्ट्रवादी’चा पाठिंबा राहील, असे कोणी म्हणत असेल तर ते निखालस खोटे आहे. जातीयवादी पक्षाच्या उमेदवाराला आमचा मुळीच पाठिंबा राहणार नाही.

निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी वरील निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली असून त्यांचे मेव्हणे व शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ‘राष्ट्रवादी’च्या काही स्थानिक नेत्यांशी संधान साधले आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्याशी थेट संपर्क साधून आमदार चव्हाण यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ची भूमिका समोर आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व आमदार तटकरे यांच्यातील आगामी बठकीनंतर सर्व बाबी स्पष्ट होतील. विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे संख्याबळ जास्त असून ते टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र राहावे लागेल, असे आमदार चव्हाण म्हणाले.

ज्या ठिकाणी आमचा आमदार आहे, ती जागा आम्ही लढवावी व जेथे काँग्रेसचा आमदार आहे, ती जागा त्यांनी लढवावी. यावर उभय पक्षांमध्ये जवळपास एकमत झाले आहे. काँग्रेस पक्षाने फक्त पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याच्या जागेच्या संबंधाने आवरावे, अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.