मराठवाडय़ातील ६२ महसूल मंडळात कमी पाऊस, चाराटंचाईची शक्यता

हवामान विभागाने औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा दिलेला इशारा कोरडाच गेला. सिल्लोड आणि कन्नडच्या काही भागात हलक्या सरी पडून गेल्या. मात्र, या पावसामुळे पाणीसाठय़ात कोठेही वाढ झाली नाही. अजूनही मराठवाडय़ातील ४२१ महसूल मंडळांपैकी ६२ महसूल मंडळात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस आहे. बीड आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातील स्थिती अधिक गंभीर बनली आहे. येत्या काही दिवसांत चाराटंचाई जाणवेल, असे अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्य़ाची सरासरी ६७५.४६ मि.मी. एवढी आहे. १ जून ते २२ सप्टेंबपर्यंत ५८१.६४ मि.मी. पाऊस पडावा, असे अपेक्षित होते. मात्र, पाऊस नोंदवला गेला केवळ ३५०.८३ मि.मी. सरासरी केवळ ५२.९६ टक्के पाऊस नोंदवला गेल्याने काही तालुक्यांतील पिके पूर्णत: वाया गेली आहेत. वैजापूर, गंगापूर व पैठण तालुक्यातील काही महसूल मंडळात पाऊस न झाल्याने आलेली पिके रब्बी हंगामाच्या तयारीसाठी काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मका, तुरीचा भुसा आणि बाजरी जनावरांना खायला दिली जाते. या पिकांची वाढ पुरेशी झालेली नव्हती. त्यामुळे या तालुक्यांमध्ये चाऱ्याचे प्रश्न निर्माण होतील, असे कळविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, असेही कळविण्यात आले आहे. बीड जिल्ह्य़ातील काही तालुक्यांमध्येही अशीच स्थिती आहे.

एका बाजूला दुष्काळछाया दाटून आलेली असताना मराठवाडय़ातील काही भागात ऊस मात्र पद्धतशीरपणे जपला जात आहे. लागवडीचे प्रमाण एवढे अधिक होते,की या वर्षी तो अतिरिक्त ठरेल, असाही सरकार विभागाचा अंदाज होता. मात्र, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या चार जिल्ह्य़ांमध्येच उस घालवण्यासाठी शेतकऱ्यांना कारखानदारांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पाऊस तसा आला नाही. परिणामी पाणीसाठय़ांमध्ये वाढ झालेली नाही. अजूनही गंगापूर, वैजापूर या दोन तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे.

पावसातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागल्याने स्थिती गंभीर झाली आहे. दोन दिवसाने पाऊस पडेल असा इशारा दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या पावसावर रब्बी हंगामाची भिस्त होती. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर स्थिती गंभीर होईल, असे मानले जात आहे.

मराठवाडय़ावर ढग दाटून आले होते, पण पाऊस पडण्यासाठी आवश्यक असणारा दाब हवेत नसल्यामुळे हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा कोरडाच गेला! प्रमुख धरणांमध्ये ३८.३५ टक्के एवढाच पाणीसाठा असून मोठा पाऊस झाला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे चित्र निर्माण झाले आहे.