अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र

बिपिन देशपांडे लोकसत्ता

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील रश्मी अभ्यासात हुशार. खेळ, चित्रकलेतही नैपुण्य मिळवलेले. दहावी झाली आणि तिची शाळा बंद केली गेली. कारण काय? तर आजीला रश्मीच्या लग्नाचा सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहायचा आहे. रश्मीला मात्र खूप शिकायचे आहे. अखेर तिने कुटुंबीयांचा लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा विचार पाहून थेट ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना पत्र लिहिले आणि आपली कैफियत मांडली.

रश्मी काही एकटीच नाही. अन्य काही मुलींनीही लग्नाच्या संदर्भाने पत्र, ई-मेल केलेली असून यानिमित्ताने ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण, कन्नड, गंगापूर आदी तालुक्यांत सध्या अल्पवयीन मुलींचे लग्न उरकून टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्याला रश्मीच्या निमित्ताने पुष्टी मिळालेली आहे. पैठण तालुक्यातील रश्मी, कन्नड तालुक्यातील मेधा (नाव बदललेले आहे) या प्रातिनिधिक स्वरूपात समोर आलेली उदाहरणे आहेत. रश्मी लिहिलेल्या पत्रात म्हणते, ‘‘मला पोलीस विभागात नोकरी करायची आहे. त्यासाठी मला शिकायचे आहे. आई-वडील व आत्याचाही माझ्या शिक्षणाला पाठिंबा आहे. मात्र आजीला माझे लग्न उरकायचे आहे.’’ रश्मीचे पत्र प्राप्त होताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी अत्यंत गुप्तपणे आणि रश्मीच्या गावातील कोणालाही खबर न लागू देता रश्मीच्या वडिलांना बोलावून घेतले. रश्मीचे पत्र प्राप्त झाल्याचे कळून दिले नाही. रश्मीचे लग्न १८ वर्षांच्या आत न करण्यासाठी तिच्या वडिलांचे समुपदेशन केले. यानंतर ग्रामीण पोलीस विभागाकडून मुंबईच्या एका संस्थेमार्फत मुला-मुलींमध्ये लिंगभेद, परस्परांविषयी आकर्षण वाटण्यासारख्या पौगंडावस्थेतील बदलांच्या संदर्भाने कार्यशाळा घेऊन जागृती करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

रश्मीसारखीच मेधाचीही कहाणी. मेधाचे आई-वडील तिच्या मागे लग्नासाठी तगादा लावत आहेत. मेधा कन्नड तालुक्यातील. शेतकरी कुटुंबातील. तिने जवळच्या मत्रिणीकडे आपली अडचण मांडली आणि गावातील एका हितचिंतकाकरवी पोलीस अधीक्षकांना ई-मेल करून माहिती दिली. रश्मी व मेधा या प्रातिनिधिक अल्पवयीन मुली आहेत. मात्र या माध्यमातून ग्रामीण भागात अजूनही अठरा वर्षांची होण्यापूर्वीच मुलींचे लग्न उरकण्याच्या विचारांचा पगडा असल्याचेच दिसत आहे. या निमित्ताने ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुलींनी पुढे यावे

ग्रामीण भागातील मुली, मुलांमध्ये परस्परांमधील लिंग भेद, आकर्षण, याबाबत कार्यशाळा घेऊन जागृती करण्यात येत आहे. मुलींनी कुठलीही भीती न बाळगता अठरा वर्षांच्या आत लग्न करण्यासाठी दबाव आणला जात असेल तर तक्रारीसाठी पुढे यावे. त्यांचे नाव आम्ही गुप्त ठेवून कुटुंबीयांना समजावले जाईल.

 – मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक

ग्रामीण भागात ७० टक्के बालविवाह

मराठवाडय़ातील बहुतांश ग्रामीण भागात बालविवाहांचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत आहे. वयात आलेल्या एखाद्या मुलीला कोणी फूस लावून पळवून नेले अथवा अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता दिसते आहे. ऊसतोड मजुरी करण्यासाठी जातानाही मुलींबाबतची असुरक्षितता वाटत असल्यानेही अल्पवयात विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल असतो. बीड जिल्ह्य़ातील माजलगाव, बीड तालुक्यातील अलीकडेच अनेक बालविवाह रोखण्यात आलेले आहेत. साधारण वर्षभरात १०० ते १२५ बालविवाह रोखले जातात. सुदैवाने त्याची आमच्यापर्यंत माहिती आलेली असते. माजलगाव तालुक्यातील एका दहा वर्षांच्या मुलीचा विवाह ३२ वर्षांच्या व्यक्तीशी लावून देण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.

 – तत्वशील कांबळे, अध्यक्ष, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड.