संस्थांच्या अध्यक्ष, सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद  :  जनश्री विमा योजनेचा गैरफायदा घेत सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जीवन विमा पॉलिसीला ९९ लाख ३० हजार रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मृताच्या नावे रक्कम उचलल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्याची पॉलिसी काढल्याचा प्रकारही उजेडात आला आहे. त्यावरून शहरातील आठ संस्थांमधील दहा जणांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अली खान दौड खान, मोहिन खान रहीम खान, ए. एच.  शामकुळे, भारत बोराडे, शंकर गायकवाड, एन. एन. कानडे, सुभान अहमेद शाह, शकील अहेमद शाह, बाळासाहेब झाडे व महेंद्र गडवे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात भीमराव संपतराव सरवदे यांनी तक्रार दिली आहे. ते अदालत रोडवरील भारतीय आयुर्विमा महामंडळातील निवृत्ती वेतन व समूह विमा विभागात दोन वर्षांपासून कार्यरत असलेले वरिष्ठ शाखा अधिकारी आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार भारतीय आर्युविमा महामंडळाच्या वतीने २००० मध्ये जनश्री विमा योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत असंघटित लोकांच्या समूहासाठी जीवन विमा पॉलिसी देण्यात येते. नियमाप्रमाणे पॉलिसीअंतर्गत समूहातील प्रत्येक सदस्याचा ३० हजारांचा विमा उतरवण्यात येतो. योजनेअंतर्गत असंघटित लोकांची नोंदणी सामाजिक संस्थेमार्फत केली जाते. नोंदणी झालेल्या सदस्यांच्या विम्याच्या अर्धा विमा हप्ता केंद्र शासन व उर्वरित अर्धी रक्कम संस्था भरते. प्रत्येक नोंदणीकृत समूहासाठी एक मास्टर पॉलिसी काढली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळाची समूहविमा योजनेअंतर्गतसुद्धा समूहविमा देण्यात येतो. या समूहविमा योजनेअंतर्गत कमीतकमी २५ जणांच्या समूहासाठी विमा पॉलिसी दिली जाते. समूहविमा योजनेचा पूर्ण हप्ता संस्थेमार्फत भरला जातो. दरवर्षी नियमाप्रमाणे महामंडळाच्या वतीने डिसेंबर २०१८ मध्ये वरिष्ठ कार्यालयामार्फत निरीक्षण करण्यात आले. त्याचा अहवालानुसार विभागीय कार्यालयाने प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. समितीने प्रकरणांचा अहवाल ६ मार्च २०१९ रोजी वरिष्ठ कार्यालयाला दिला. त्यानंतर ५ व १८ एप्रिल दरम्यान प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल संबंधित कागदपत्रासह सादर करण्यात आला. या तपास अहवालात विभागातर्फे आलेल्या मृत्यू दाव्याच्या कागदपत्रांमध्ये काही संस्थांनी बनावट व खोटे मृत्यू प्रमाणपत्र सादर करून चुकीचे दावे दाखल केले. त्याआधारे त्यांनी रक्कम उचलली आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये ज्या सदस्यांचा मृत्यू दावा एका योजनेअंतर्गत घेतला गेला, तीच व्यक्ती पुन्हा दुसऱ्या योजनेत जिवंत दाखविण्यात आली आहे. तसेच त्याच्या नावावर आणखी एक मृत्यू दावा केल्याचे लक्षात आले. तसेच यातील काही व्यक्ती सध्या हयात आहेत, असे चौकशीअंती आढळून आले. तपासणीत संस्थेमार्फत दाखल केलेले मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आले.

फसवणाऱ्या संस्था

साईबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, चतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, प्रसार भारती गृहतारण संस्था, स्वराज्य मराठवाडा कामगार संघटना, श्री सप्तशृंगी सेवाभावी संस्था, साईश्रद्धा समाज व शैक्षणिक संस्था, खिर्डी, विशाल प्रतिष्ठान संस्था, जय तुळजाभवानी संस्था, जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, जरंडी, ता. सोयगाव, या संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांनी ९९ लाख ३० हजार रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास निरीक्षक रामेश्वर रोडगे करत आहेत.