देशभरातील भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव उद्यापासून (मंगळपार) सुरू होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिराचा परिसर रोषणाईमुळे उजळून निघाला. संबळाचा निनाद, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि आकाशातील आतषबाजीमुळे सारा आसमंत भक्तिरसात चिंब भिजून निघाला. रोषणाईच्या या सोहळ्याने अनेकांचे डोळे दिपवून टाकले.
रविवारी रात्री देवीचरणी केलेला रोषणाईचा अर्पण सोहळा भाविकांसाठी आकर्षण ठरला. मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारासमोर झालेल्या या कार्यक्रमास महंत तुकोजीबुवा, प्रशासकीय व्यवस्थापक सुजित नरहरे, पोलीस उपायुक्त बापू कुतवळ, दीपक मानकर, बापूसाहेब उंडाळे, उमेश दराडे, महेश तेवारे आदी उपस्थित होते. बटण दाबून रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राजे शहाजी महाद्वारावर सुमारे अर्धा तास डिजिटल फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नवरात्र काळात भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, या साठी धर्मदर्शनाची रांग चौथ्या मजल्यावरून, मुखदर्शनाची रांग तळमजल्यातून व अभिषेकाची रांग अभिषेक हॉलमधून राहणार आहे.
काळभरव पायऱ्यांवरुन भाविकांना विविध रांगांतून धर्मदर्शन, मुखदर्शन, अभिषेकासाठी वेगवेगळ्या रांगा केल्या आहेत. रांगांशेजारी आपत्कालीन मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. परिसरात पाच मजली दर्शन मंडप इमारत बांधली असून इमारतीत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची प्रत्येक मजल्यावर सोय करण्यात आली आहे. दर्शन रांगेत स्टील रेलिंग, प्रत्येक हॉलमध्ये एलएडी स्क्रीनद्वारे गाभाऱ्यातील व मंदिर परिसरातील प्रक्षेपण भाविकांना पाहावयास मिळणार आहे. दर्शन मंडप इमारतीत एका वेळी ८ ते १० हजार भाविकांची सोय असून यात धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी दोन स्वतंत्र रांगांची सोय करण्यात आलेली आहे. संपूर्ण इमारतीत अग्निशामक यंत्रणा, अभिषेक पूजा करणारे, भाविकांना रांगेत थांबण्यासाठी मंदिराच्या बाजूस शिवपार्वती मंगलधाममध्ये अभिषेक हॉल, भाविकांसाठी सर्व धार्मिक विधींची माहिती, दर्शनी भागात सूचना फलक व दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत.
शारदीय नवरात्र महोत्सवात पूर्वापार परंपरेनुसार श्रीदेवीजींचे अनेक धार्मिक विधी होतात. त्यात घटस्थापना, छबीना आणि नवरात्रात दररोज विविध अलंकार महापूजा, वैदिक होम, होमावरील धार्मिक विधी, सीमोल्लंघन, श्रीदेवीजींची मंचकी निद्रा, कोजागरी पौर्णिमा, सोलापूरच्या काठय़ांसह छबीना हे धार्मिक विधी होणार आहेत. शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत घटस्थापनेपासून खंडेनवमीपर्यंत आराध भाविक श्रीदेवीजींची सेवा करतात. आराध बसणाऱ्या भाविकांची संख्या अंदाजे ५००च्या जवळपास असते. या भाविकांसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानची रामदरा तलावाखाली विहीर असून विहिरीत दोन कूपनलिकांद्वारे पाणी सोडून विहिरीतील पाणी घाटशीळ येथील जलकुंभात व घाटशीळ जलकुंभातील पाणी धर्मशाळेजवळील जलकुंभात सोडण्यात येते. या ठिकाणी २४ तास कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मंदिरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र डी. पी. बसविले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलकुंभांची स्वच्छताही वेळोवेळी करून घेतली जात आहे. भाविकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापक सुजित नरहरे आणि त्यांचे सहकारी मंदिर संस्थानच्या तयारीवर लक्ष ठेवत असून उपाययोजना तत्काळ करण्यात येत आहेत.
तुळजापूरला चोख बंदोबस्त; जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथे बंदोबस्तासाठी २ हजार १०० पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, सहा ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्रेही सज्ज ठेवली आहेत.
नवरात्रोत्सव काळात तुळजापुरात लाखो भाविक दर्शनास येत असतात. मंदिर, परिसर आणि विविध मार्गावरून पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दीड हजार पोलीस कर्मचारी तनात केले आहेत. याबरोबरच २०० पोलीस अधिकारी व ४०० होमगार्ड असे एकूण २ हजार १०० पोलीस तनात आहेत. मंदिरात एखादी बेवारस वस्तू सापडली तर भाविकांनी पोलीस कक्षात माहिती द्यावी. मंदिराच्या विविध भागांत ठिकठिकाणी पोलीस कक्ष स्थापन केले असून, भाविकांनी नवरात्रोत्सव काळात शिस्तीत देवीदर्शन घ्यावे व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी केले.
मंदिर व परिसरात दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे
तुळजाभवानी मंदिर व परिसरात १४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिरातील नियंत्रण कक्षातून या कॅमेऱ्याद्वारे मंदिर व परिसरातील हालचालींवर नजर ठेवली जात आहे. याशिवाय शहराच्या विविध भागांतील हालचालींवर लक्ष ठेवण्यास नगरपालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत पालिकेकडून ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. साधारणत: ८० ते १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले आहे.
स्वच्छतेसाठी १००, सुरक्षेसाठी संस्थानचे २०० कर्मचारी
मंदिर व परिसरात पोलीस विभागाच्या सूचनेनुसार सर्व ठिकाणी बॅरीकेटिंग लावण्यात आले. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर परिसर स्वच्छ राहावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हे काम दोन शिफ्टमध्ये जास्तीचे १०० कर्मचारी नियुक्त करून करण्यात येत आहे. कचरा टाकण्यासाठी कचरापेटी ठेवण्यात आली आहे. मंदिर परिसरात जंतुनाशक पावडरची फवारणी करण्यात आली. वेटस्वीपद्वारे सर्व स्वच्छतागृहांची सफाई प्रत्येक तासाला करून घेण्यात येत आहे. याशिवाय सुलभ शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरातील सुरक्षेचे काम खासगी सुरक्षा कंपनीकडे देण्यात आले असून, यासाठी २०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भाविकांचे साहित्य तपासण्यासाठी दोन स्कॅनिंग मशिन, प्रवेश करतेवेळी डीएफएमडी बसवण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांना मंदिर संस्थानमार्फत एचएमएचडी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सहा ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे
चालत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. श्री तुळजाभवानी देवीमंदिरात दोन, शिवाजी चौकात एक, दोन्ही बसस्थानकांवर दोन, उस्मानाबाद रस्त्यावर एक अशा सहा ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय १०८ची रुग्णवाहिका व इतर तीन रुग्णवाहिका तनात राहणार आहेत. यातील एक रुग्णवाहिका घाटशीळजवळ व एक मंदिराजवळ राहणार आहे. शहराच्या सर्व खासगी दवाखान्यांतील ५ बेडप्रमाणे एकूण १५ टक्के बेड भाविकांसाठी आरक्षित ठेवले आहेत. १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ९९ आरोग्य कर्मचारी शहरात कार्यरत राहणार आहेत.