29 October 2020

News Flash

सरकारी रुग्णालयात पहिल्यांदाच अवयवदान

वैजापूर येथे फर्निचरचे काम करणाऱ्या गणेश शंकर घोडके या २७ वर्षांच्या युवकाचा मेंदू अपघातात मृत (ब्रेन डेड) झाला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.

वैजापूर येथे फर्निचरचे काम करणाऱ्या गणेश शंकर घोडके या २७ वर्षांच्या युवकाचा मेंदू अपघातात मृत (ब्रेन डेड) झाला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात हृदय, यकृत, मूत्रपिंड व डोळे हे अवयव दान करण्यासाठीची शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली. त्यामुळे सहाजणांना जीवनदान मिळाले. राज्यात प्रथमच शासकीय यंत्रणेने अवयव दानाची यशस्वीपणे ही प्रक्रिया पार पाडली. डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सुहास जेवळीकर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली.
गणेश घोडके याला बुधवारी (दि. २४) श्रीरामपूर तालुक्यातील नाहूरगंगा येथे अपघात झाला. पुलावरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मेंदू ९९ टक्के काम करीत नसल्याचे सांगण्यात आले. औरंगाबादच्या दत्ताजी भाले रक्तपेढीतील डॉ. महेंद्र चौहान आणि राजकुमार खिंवसरा यांनी गणेशच्या नातेवाईकांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला बोलावून घेतले. त्यानंतर घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. घाटी रुग्णालयातील डॉ. सुरेश हरबडे यांनी रुग्णाच्या नातेवाईकास अवयव दानाचे महत्त्व पटवून सांगितले. गणेशची आई इंदुबाई, बहीण शीतल वाकचौरे, संजय घोडके, नारायण वाकचौरे, अंकुश अगम यांनी अवयव दान करण्यास तयारी दाखवली. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने समितीस त्याबाबतचा निर्णय कळवला. डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी अवयव दानाच्या प्रक्रियेस मान्यता दिल्यानंतर ब्रेन डेड रुग्णाची दोन वेळा समितीने तपासणी केली. त्यानंतर दुपारी गणेशचे हृदय, यकृत, मूत्रपिंड व दोन्ही डोळे शस्त्रक्रिया करून विविध ठिकाणी पाठविण्यात आले.
हृदय चेन्नई येथे, यकृत पुणे येथे व औरंगाबाद शहरात मूत्रपिंड दान करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. ज्योती कुलकर्णी, डॉ. सुचेता जोशी यांनी शस्त्रक्रिया करून अवयव पुढे पाठविण्याची व्यवस्था केली. या प्रक्रियेदरम्यान अवयवाचे जतन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधींचा खर्च के. के. ग्रुपच्यावतीने करण्यात आला. अकील अहमद व किशोर वाघमारे यांचा हा ग्रुप आहे. विविध ठिकाणी अवयव वेळेत पाठविण्यासाठी औरंगाबादच्या पोलिसांनी पुन्हा एकदा रुग्णालय ते विमानतळ असा ग्रीन कॉरीडोर निर्माण केला.
अवयव दान करताना गरजू रुग्णांना तो पाच तासांत द्यावा लागतो. विशेषत: हृदयासाठी ही काळजी घेणे खूपच आवश्यक असते. वैद्यकीय भाषेत त्याला कार्डिलोप्लेजिया असे म्हटले जाते. ज्या रुग्णाचे अवयव काढले आहे, त्याची रक्तवाहिनी आणि गरजू रुग्णाची रक्तवाहिनी सारख्या आकाराच्या असाव्या लागतात. त्याचबरोबर त्याचा रक्तगटही एकच असावा लागतो. अवयव दानापूर्वी सोनोग्राफी, एक्स-रे, टुडीइको आदी चाचण्या केल्या जातात. राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात अवयव दानाची प्रक्रिया झाल्याने घाटी रुग्णालयातील डॉक्टरांचे अभिनंदन होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 1:10 am

Web Title: limb donate in government hospital
Next Stories
1 ‘टँकरच्या निविदेत देवाण-घेवाणीमुळे अधिक दर’!
2 सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्ग निराशेच्या रुळावर!
3 परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाची यंदाही २०० कोटींवर बोळवण
Just Now!
X